काही लोक मनुवादी राज्यघटना आणू पाहात आहेत. ते होऊ नये म्हणून बहुजनांनी एकत्र यावे, तेव्हाच खऱ्या अर्थाने येथे लोकशाही येईल व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली; पण तिची अंमलबजावणी इतर विचारांच्या लोकांनी केली. म्हणून येथील गोरगरिबांची स्थिती सुधारली नाही. राज्यघटना चालविण्यासाठी आंबेडकरांच्या विचाराचा माणूसच सरकारात बसला पाहिजे. ‘तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो’ असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मंगळवारी विभागीय गायरान हक्क परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजय वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या गायरान हक्क परिषदेत आंबेडकर बोलत होते. परभणी व िहगोली जिल्ह्यातील दलित कष्टकरी, गायरानधारक लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, आपण आपसात भांडत बसलो आहोत हे आपले दुर्दैव आहे. आरक्षण मिळाले म्हणून आमची पोरं डॉक्टर, इंजिनिअर बनले, पण आता काळ बदलला. डॉ. बाबासाहेबांनी देशाला लोकशाही दिली, पण त्याची पोरं भीक मागत आहेत हे बरे नाही. आम्ही २४ दिवस इंदू मिल जागेसाठी आंदोलन केले व ही जागा सरकारकडून मिळवली. तसा मराठवाडा विभागातील गायरानाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडून आम्ही लवकरच सोडवू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
परिषदेचे अध्यक्ष वाकोडे यांनी गायरान हक्काचा प्रश्न महत्त्वाचा आहे असे सांगून अन्यायाविरुद्ध लढायला शिका. स्वाभिमानाने राहा, असे आवाहन केले. परिषदेचे प्रास्ताविक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सांके यांनी केले. आनंद नेरलेकर यांनी पक्षाला दहा हजारांची देणगी जाहीर केली. कीर्तीकुमार बुरांडे यांनी मराठवाडय़ातील गायरान कसणाऱ्या बहुजनांची व्यथा मांडली. रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीपती ढोले, वसंत कांबळे, भाई सावंत, काशीनाथ निकाळजे आदींची भाषणे झाली. गायरान हक्क परिषदेचे उद्घाटन करताना आनंदराज आंबेडकर यांनी शहरात आपल्या पक्षाच्या चार शाखा निर्माण झाल्याचे सांगून त्यांचे उद्घाटन केले. परिषदेत विजय वाकोडे यांना पक्षाचे उपाध्यक्ष व आनंद नेरलेकर यांना सरचिटणीस केल्याचे घोषित केले.