छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी धमक्यांचे फोन आले असून फोनवरून शिवीगाळ केली असल्याची तक्रार त्यांनी छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे दानवे यांनी दिली आहे. अज्ञात व्यक्तीने १५ मार्च रोजी रात्री ०२ वाजता सतत कॉल करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद असून ‘कापून टाकू ’आणि ‘ठोकून काढू ’ असली धमकी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. ११ मार्च ते १४ मार्च रोजी असे दूरध्वनी कॉल आल्याचेही दानवे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

धमकी देणाऱ्याने कोणतेही कारण सांगितले नाही. असे फोन येत असतात. पण या वेळी ते सलग दोन तीन दिवस आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. धमक्यांना घाबरत नाही. नेहमी वावरताना शिवसैनिकांपैकी कोणी ना कोणी बरोबर असते. अशा अशा धमक्यांना भीक घालायचे नसते, हेही माहीत आहे. मात्र, यावेळी ‘ कापून टाकू ’ , ‘ ठोकून काढू’ अशी भाषा वापरल्याने अंबादास दानवे यांनी सांगितले. हे फोन ९५९५९५९३०३ या क्रमांकावरुन आले असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे. १५ मार्च रोजी रात्री १२.५४ मिनिटांनी फोन आल्याने कोणीतरी अधिक संकटात असू शकते म्हणून दानवे यांनी दूरध्वनी उचलला. तेव्हा धमकी दिल्याचे ते म्हणाले.

एखादा दारु पिलेला असू शकतो म्हणून मागील काही दिवसापूर्वी येणाऱ्या धमकीच्या फोनकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, शेवटच्या फोनमध्ये अन्य दोघा तिघांचे आवाज येत होते. पूर्वी एकदा अशा फोनला एकदा प्रतिउत्तरही दिले होते. मात्र, नंतर येणारे फोन फक्त ऐकून घेतले, असेही दानवे यांनी म्हटले आहे.

अशा धमक्यांमुळे कुटुंबियांच्या जीवासही धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती दानवे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केली आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी करावी अशी विनंती दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करताना दानवे यांनी अनेकांवर वेगवेगळे आरोप केले होते. त्यामुळे दानवे हे राजकीय पटावर चर्चेत असतात. आता त्यांना धमक्याचे फोन आल्यामुळे धमक्या देणारे कोण याचा तपास करावा अशी मागणी केली जात आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात गणेश मस्के यांनी या अनुषंगाने तक्रार दिली आहे.