Ambadas Danve : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर महायुतीमधील पक्षच आमने-सामने आल्यामुळे महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
असं असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केला आहे. एका माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. मारहाण करणारा व्यक्ती हा एका मंत्र्याच्या जवळचा असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेवरून अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अंबादास दानवेंची पोस्ट काय आहे?
“क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय…पण मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर ना देवभाऊ?”, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये काय?
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही जण एका व्यक्तीला दगड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. यामध्ये मारहाण करणाऱ्यांपैकी एक व्यक्ती हा माजी नगरसेवक असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच हा माजी नगरसेवक मंत्री अतुल सावे यांच्या जवळचा असल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
