छत्रपती संभाजीनगर : तुमचा मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकारी पाक अन् शिवसेनेत येणारा मुस्लिम नापाक, असा भेद कसा काय होऊ शकतो, असा सवाल विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला उद्देशून केला. ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होऊ द्या, आम्हीही हिंदुत्ववादीच आहोत, असेही त्यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात सांगितले.

भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिमधार्जिणे ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. माजी महापौर रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश देऊन तिकीट दिल्याचाही मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जात आहे. आता जुनी किती प्रकरणे काढायची. दंगलीमध्ये तर आम्हीसुद्धा होतो. रशीद मामू हे समाजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात स्थान दिले, असे दानवे यांनी सांगितले.

भाजप आता पक्ष, संघटना राहिली नसून, ती एक कंपनी झाली आहे. त्यांच्याकडे आता कार्यकर्ता नसला तरी चालतो. शिवसेनेचा ठाकरे गट मात्र कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. शिवसेनाही पूर्वीही आणि आत्ताही हिंदुत्ववादीच संघटना असून, ही भूमिका कायम राहील, असे दानवे यांनी सांगितले.

रशीद मामू हे महापौर असताना भाजपही आमच्या बरोबर होती. मामू सर्वांबरोबर राहिलेले आहेत. गणेशोत्सव, जयंती उत्सवात हिरीरिने सहभागी व्हायचे, ४० वर्षांपूर्वीच्या घटनाक्रमाला आजच्या परिस्थितीशी जोडणेही किंवा मुस्लिमधार्जिणे म्हणणे योग्य नाही. अंबादास दानवे, शिवसेना नेते (ठाकरे गट)