छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील अंबाजोगाई येथे भिलारच्या धर्तीवर ‘पुस्तकाचे गाव’ निर्माण करण्याची भाषामंत्री उदय सामंत यांनी केलेली घोषणा अद्यापही हवेतच आहे. प्रशासकीय स्तरावरील कार्यवाहीची हालचाल सध्या थंडावलेली असून, प्रत्यक्षात पुस्तकाचे गाव कधी अवतरेल, अशी विचारणा आता होत आहे.

गतवर्षी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग तथा भाषामंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाई येथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा १६ एप्रिल (२०२५) रोजी केली होती. महिनाभरात या प्रकल्पावर बरेच काम झालेले असेल, असेही त्यांनी आश्वस्थ केले होते. मराठीतील प्रसिद्ध कवी तथा छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डाॅ. दासू वैद्य यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून मंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाईचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व, स्वामी रामानंद तीर्थांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाची सुरू केलेल्या चळवळीचे प्रमुख ठिकाण, सांस्कृतिक क्षेत्रातील स्थान, मुकुन्दराजांची समाधी आणि मराठीतील आद्यग्रंथ मानला गेलेल्या ‘विवेकसिंधु’ची निर्मिती, ‘पासोडी’कार दासोपंतांचे वास्तव्याचे ठिकाण, सध्याही सक्रीय असलेली वाचन चळवळ, आदींचा विचार करून ‘पुस्तकाचे गाव’ अंबाजोगाईतच निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

या निर्णयानंतर भिलार येथील काही तज्ज्ञ, अभ्यासक मंडळींनीही अंबाजोगाईत येऊन पाहणी केली. मात्र, पुढे फार काही घडले नाही. ‘पुस्तकाचे गाव’ करण्याची घोषणा होऊन आता दहा महिने उलटले असून, अद्यापही प्रशासकीय पातळीवर फार काही घडामोडी झाल्याचे दिसत नाही.

अंबाजोगाईत ‘पुस्तकाचे गाव’ निर्माण करण्याचा निर्णय गतवर्षी मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. अंबाजोगाईचे शैक्षणिक, सांस्कृतिक एक महत्त्व असल्याने पुस्तकाचे गाव करण्याचा विचार पुढे आला. त्यावर प्रशासकीय स्तरावरून पुढे काही कार्यवाही सुरू आहे. – प्रा. डाॅ. दासू वैद्य.

अंबाजोगाईत पुस्तकाचे गाव निर्माण करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने आता हालचालींना वेग आला आहे. मध्यंतरी भिलार येथील काही अभ्यासकांनी येऊन पाहणीही केली. आमदार नमिता मुंदडा यांनी काही बैठकाही घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. – अभिजित जोंधळे, ग्रंथसखा पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते