छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोकणवासियांची देवी म्हणून परिचित असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी देवस्थानाला मुंबईस्थित एका भक्ताने एक कोटी रुपयांची देणगी धनादेशाच्या स्वरुपात पाठवली आहे. मंदिराच्या शिखर बांधकामासाठी ८० ते ९० रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनाम त्या भक्ताने एक कोटी रुपयांची देणगी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पाठवली आहे.

देवस्थानचे सचिव गिरधारीलाल भराडिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार योगेश्वरी देवीच्या मंदिराचे असलेले शिखर हे शंभर वर्षांपूर्वीचे आहे. २०-३० वर्षांपूर्वी शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. आता पुन्हा हे काम करावे लागणार आहे. त्यासाठी ७० ते ८० लाखांचा खर्च अपेक्षित असून, देणगीसाठी भाविकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मुंबईस्थित एका भक्ताने त्यांच्या एका विश्वासू व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक कोटी रुपयांचा धनादेश विश्वस्तांची भेट घेऊन सुपूर्द केला. संबंधित भक्ताने आपले नाव कुठेही जाहीर करू नये, अशी विनंती केली आहे. एक कोटींच्या धनादेशाची रक्कम देवस्थानच्या खात्यावर जमाही झाली आहे.

आता विश्वस्तांची एक बैठक घेऊन प्रत्यक्ष शिखराचे काम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वीचे काम तामिळनाडू येथील कारागिरांकडून करण्यात आले होते. आत्ताही त्यांच्याशीच संपर्क करण्यात आला आहे. त्यांचे कारागिर येऊन शिखराची पाहणी करतील आणि खर्चाची माहिती मांडतील. शिखराचे बांधकाम चुना-मातीमध्ये करण्यात आलेले आहे. यामध्ये सिमेंटचा वापर अजिबात झालेला नाही. त्याचप्रमाणे आताही जीर्णोद्धाराचे काम करण्यात येणार आहे, असे भराडिया यांनी सांगितले. दरम्यान, एक कोटींची रक्कम देणगीस्वरुपात देणारा भक्त कोण, याविषयी उत्सुकतेची चर्चा सध्या अंबाजोगाईत सुरू आहे.

योगेश्वरी देवी ही कोकणस्थांची म्हणून ओळखली जाते. अंबाजोगाईमध्ये नवरात्रात नऊ दिवस मोठा ऊत्सव असतो. पुणे, मुंबईसह कोकणातूनही मोठ्या संख्येने भाविक-भक्त नवरात्रासह इतरही दिवसांमध्ये आवर्जून येतात. अनेक परदेशात वास्तव्य करणारे कोकणस्थही मायदेशात आल्यानंतर आवर्जून अंबाजोगाईत येऊन योगेश्वरीचे दर्शन घेतात. साडेतीन पीठांपैकी मराठवाड्यात तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका माता देवीचे दोन प्रमुख पीठ असून, या दोन देवस्थानच्या मध्ये अंबाजोगाईचीही देवी असल्याने योगेश्वरी दर्शन घेण्यालाही भाविक प्राधान्य देतात.