छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येस गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेस ‘लाभार्थी’ना बोलावा. आवश्यकता भासल्यास राज्य परिवहन मंडळाच्या बस लावा आणि मराठवाडय़ातून ५० हजार नागरिकांना जमवा, असा आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर गृहमंत्र्यांची शहरातील रिद्धी-सिद्धी लॉन्स येथे सभा होणार आहे. पूर्वी ही सभा अयोद्धानगरीत घेण्याचे नियोजन होते.

तत्पूर्वी  मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील रंगरंगोटीच्या कामांना मंगळवारी वेग आला होता. या सभेला मराठवाडय़ातून जाणकारांना बोलविणार असून अधिकाधिक संख्येने नागरिकांनी यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. विविध ठिकाणी मंडप उभारण्याच्या कामालाही गती देण्यात आली. दरम्यान, डॉ. कराड यांनी हैदराबाद मुक्ती दिनाच्या सभेच्या तयारीबाबत विभागीय आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या तरतुदीसाठी रक्कम मिळावी, याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या अंतिमीकरणालाही वेग आला होता.

१५ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये मराठवाडा मुक्ती दिन अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघणार असून, क्रांती चौकातून फेरी मराठवाडा सांस्कृतिक मंडळापर्यंत जाणार आहे. या मैदानास ‘अमृत नगरी’ असे नाव देण्यात आले आहे.  याच ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची माहिती देणारे प्रदर्शनही अयोजित करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हे प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे.  वंदे मातरम सभागृहात विविध विषयांवरील व्याखानांचे कार्यक्रम होणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी वंदे मातरम् सभागृहात मंथन -२ मध्ये उद्योजकांनी विकासासाठी तयार केलेल्या अजेंडय़ांवरही चर्चा होणार असून, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही हजेरी असेल, असे डॉ. कराड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुक्ती दिनाच्या ध्वजारोहणाची वेळ बदलली

 हैदराबाद संस्थान मुक्ती दिनाचा कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हैदराबाद येथे होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले असल्याने दरवर्षी होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ६.१५ ते ७.३० या कालावधी होणार असल्याची माहिती  डॉ. भागवत कराड यांनी दिली.

अमित शहा यांच्या सभेसाठी ५० हजारांची गर्दी

गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या निमित्ताने ५० हजार नागरिकांनी उपस्थित रहावे, असे उदिद्ष्ट  ठरविण्यात आले आहे.  दरम्यान, कोणत्या जिल्ह्यातून किती व्यक्तींना बोलावयाचे याचे नियोजनही आखले जात आहे. जाणकारांना आम्ही बोलावले आहे. आमच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असा दावा  कराड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Story img Loader