छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नवनियुक्त अमोल येडगेच राहणार असल्याचे शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले. येडगे यांनी मावळते आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. नवनियुक्त येडगेंऐवजी आधीचे आयुक्त श्रीकांत यांची आम्ही बदली रद्द करू, मुख्यमंत्र्यांनाही भेटू, असे पालकमंत्री संजय शिरसाट व भाजपचे नेते, राज्याचे बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना सांगितले होते. परंतु, दोन्ही मंत्र्यांचे विधान हवेत विरल्याचा संदेश शनिवारी गेला.

महापालिकेचे ३१ वे आयुक्त म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची शनिवारी मावळते आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून पदभार स्वीकारला. महापालिकेचा पहिल्यांदा पदभार स्वीकारत असलो तरी मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करण्याचा आनंद असून, सर्वांच्या सहकार्याने शहरवासीयांना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, असे नवे आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ३ एप्रिल रोजी सायंकाळनंतर काढले. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत व महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तपदी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशनच्या संचालकपदावर नियुक्ती झाली आहे. मात्र, जी. श्रीकांत यांच्या माध्यमातून पैठणहून छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आणावयाच्या पाणीपुरवठा योजनेसाठीचे कामकाज गतीने करवून घेण्यासाठी त्यांची बदली रद्द करावी, असे प्रयत्न सुरू झाले होते. त्यावर पालकमंत्री संजय शिरसाट व भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी आम्ही जी. श्रीकांत यांची बदली मुख्यमंत्र्यांना भेटून रद्द करू, असे सांगण्यास सुरुवात केली होती. परंतु, शनिवारी सायंकाळी अमोल येडगे यांनी आयुक्तपदाचा पदभार जी. श्रीकांत यांच्याकडून स्वीकारला. येडगे यांचा पदभार स्वीकार हा दोन्ही मंत्र्यांना धक्काच मानला जात आहे.

जिल्हाधिकारीपदी विनय गौडा

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची अकोला येथील बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी गौडा यांनी दिलीप स्वामी यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी यापूर्वी मराठवाड्यात काम केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून तर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जी. श्रीकांत यांच्याप्रमाणेच शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण केले जाईल, असे आयुक्त अमोल येडगे यांनी जी. श्रीकांत यांच्याकडून पदभार स्वीकारताना म्हणाले. मावळते आयुक्त जी. श्रीकांत यांचा आयुक्त आणि प्रशासक म्हणून केलेल्या कामाचा कार्यकाल २ वर्षे ११ महिने १ दिवस राहिला आहे.