शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता बालवाचनालये सुरू करण्याचा उपक्रम

औरंगाबाद : टाळेबंदीत चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये कल्ला करणाऱ्या मुलांच्या हाती मोबाइलऐवजी ज्ञानग्रहणाचे माध्यम सोपवण्याची संकल्पना पुस्तकाचे दुकान चालवणाऱ्या वडिलांजवळ आठ वर्षांच्या मरीयमने मांडली आणि ‘मोहल्ला-बालवाचनालयां’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. औरंगाबादेत शुक्रवारी या प्रकारच्या २१ व्या मोहल्ला बालवाचनालयाची सुरुवात झाली. वाचन संस्कृती रुजवणारा हा वेलू मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, पुणे ते थेट जम्मूपर्यंत विस्तारत चालला आहे. यामध्ये ५ हजारांवर मुले जोडली गेली आहेत.

औरंगाबादेत याच वर्षात ८ जानेवारीला बायजीपुरा भागात पहिले मोहल्ला बालवाचनालय सुरू झाले. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही संख्या २५ पर्यंत नेण्यात येणार आहे. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरुवात झालेल्या या पहिल्या बालवाचनालयाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य फौजिया खान यांच्या हस्ते झाले. मराठी, ऊर्दू व हिंदी भाषेतील सुमारे ३०० पुस्तके सर्व बालवाचनालयात दिसतात. एका छोट्याशा कपाटात बसणाऱ्या या पुस्तकांमध्ये किशोर या अवघ्या सात रुपयांच्या पुस्तकापासून ते हिंदी, मराठी साहित्य अकादमी, ऊर्दू अकादमीकडून प्रकाशित साहित्य आहेच, शिवाय भारतातील नामवंत व्यक्ती, क्रांतिकारकांची चरित्रे, साहित्यिकांच्या माहितीवर आधारित गोष्टी, कथा, कविता, कार्टून, चित्र रंगवण्यासारखी पुस्तके मुलांसमोर ठेवली जातात. विशेष म्हणजे पुस्तक आवर्जून घरी घेऊन जायचे आणि वाचून झाल्यानंतरच परत करायचे, अशी अट आहे. अवघ्या १० हजारात आकारास येणाऱ्या या  उपक्रमास ‘मायक्रो फंडिंग-मायक्रो लायब्ररी’ असे नाव दिलेले आहे, असे वाचन संस्कृती मुलांमध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घेतलेले मरीयमचे वडील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले.

मतदान करा, पुस्तक घेऊन जा

यंदाच्या गांधी जयंतीनिमित्त ऑटोरिक्षावाल्यांना २०० पुस्तके देण्यात आली. ज्यांना वाचता येत नाही त्यांनाही त्यांच्या घरातील मुलांसाठी उपयोगात आणा, असे म्हणून दिली. निवडणुकीत मतदान करा, पुस्तक घेऊन जा, असा उपक्रम आपण मागील वर्षांपासून राबवतो आहोत. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती येत्या १५ ऑक्टोबर रोजी असून त्याअनुषंगानेही एखादा उपक्रम राबवणार आहोत, असे मिर्झा यांनी सांगितले.

आज घरात सर्व वस्तू आणल्या जातात पण पुस्तक येत नाही. मुले मोबाइलला कंटाळली आहेत. पुस्तकच त्यांना नवे माध्यम वाटायला लागले आहे. हे विदारक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत व पुणे, जळगावमध्येही बालवाचनालये सुरू झाली आहेत. जम्मूतही काम सुरू आहे. यासाठी मुस्लिमेतर व्यक्तींकडूनही मदतीचा हात मिळतो आहे. सर्व धर्मियांतील मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मुलगी मरीयमच्या आग्रहातूनच ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. शासकीय अनुदान घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवलेले आहे. – मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, अध्यक्ष, रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशन