गढूळपणा वाढविणाऱ्या वातावरणात माणूसपण वाढविण्यासाठी मानसिक आरोग्याची गरज

देशात साडेसात ते आठ हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत आणि गरज खूप अधिक आहे.

पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने डॉ. आनंद नाडकर्णी यांचा गौरव करताना डॉ. मधुकरअण्णा मुळे यांच्या समवेत डॉ. सुधीर रसाळ, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. सविता पानट, संजीव कुळकर्णी आदी.

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे मत; अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान

औरंगाबाद : करोनोत्तर काळात विघटनकारी प्रक्रियेने जोर धरला. समाजाचे एकजीवित्व खिळखिळे झाल्यामुळे नियंत्रणे कठोर झाले. परिणामी अहंकारी वृत्ती बळावली. अशा गढूळपणा वाढविणाऱ्या वातावरणात माणूसपण टिकवून ठेवायचे असेल तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर सर्वंकष मानसिक आरोग्य उपचार जपण्यासाठी या क्षेत्राने अधिक व्यापकतेने काम करण्याची गरज आहे, असे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.  अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देऊन त्यांना रविवारी गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

  करोना काळाने बरेच काही शिकविले. स्वत:ला सावरण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रासाठी हा काळ अधिक उपयोगी ठरणारा होता. गेल्या ३०-३५ वर्षांत मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात प्रबोधन करून जे झाले नाही ते गेल्या दीड वर्षांत झाले. नवोपक्रम आणि पर्यायी व्यवस्थांचा नव्याने विचार करायला शिकविले. त्यामुळेच गेल्या काळात शिक्षक, कलाकार, आदिवासी, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांशी बोलणे होऊ शकले. कारण नवीन ‘कनेक्ट’  सापडला होता. प्रतिरूप माध्यमांचा उपयोग करून अनेक उपक्रम हाती घेता आले. मानसिक आरोग्य क्षेत्रात आवश्यक भासणाऱ्या काही लाख लोकांपर्यंत रुग्णसेवा देता आली. आज चित्रपटापासून ते तत्त्वज्ञानापर्यंतच्या विविध समाजमाध्यमांवरील गटांच्या आधारे काम करता आले. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सेवादर्जा आणि संधी नव्याने तपासण्याची गरज या काळात कळाली. त्यामुळे नवनव्या व्यावसायिक गटांची बांधणी करता आली. पण मानसिक आरोग्यक्षेत्रातील समुपदेशनाचा दर्जा आणि तफावत हा भेडसावणारा प्रश्न लक्षात आला. देशात साडेसात ते आठ हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत आणि गरज खूप अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वयंसेवक आणि नवे व्यावसायिक तयार करावे लागतील. असे लक्षात आल्यानंतर अगदी योगशिक्षकांशी देखील ऑनलाइन संवाद साधण्यात आला. मनावरचे उपचार करताना केवळ मनोविकारतज्ज्ञ नाही तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनाही सहभागी करून घ्यावे लागणार आहे. तसे ऑनलाइन मोफत अभ्यासक्रमही सुरू केले असल्याचे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. आशावाद निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची निर्मितीही करावी लागणार असून गढूळपणा कमी करण्यासाठी आस्था आणि मानसिक उपचाराचा स्वीकार या सूत्राच्या आधारे काम करावे लागेल, असे डॉ. नाडकर्णी म्हणाले.

  या वेळी ‘कैवल्यज्ञानी’ या पत्रमहर्षी अनंत भालेराव यांच्यावरील स्मरणग्रंथाचेही प्रकाशनही करण्यात आले. या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, संकुचित ध्येयाला बाजूला सारून काम करणाऱ्यांसाठी कैवल्य या शब्दाचा उपयोग केला जातो. त्यात आस्था आणि करुणा हा त्याचा स्थायिभाव आहे. तसे अनंत भालेराव यांचे व्यक्तिमत्त्व होते. श्रेयस कळलेल्या माणसाला श्रेयाच्या स्पर्धेत उतरायचे नसते, हे सांगणारे कॅलिडोस्कोप म्हणजे हे पुस्तक असून त्याचा पत्रकारितेत नव्याने येणाऱ्या पिढीला अधिक उपयोग होईल. निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी हा कैवल्याचा लामणदिवा असेल, असे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर अनंत भालेराव प्रतिष्ठानचे मधुकरअण्णा मुळे, डॉ. सविता पानट, डॉ. सुधीर रसाळ, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुळकर्णी यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anand nadkarni get doctor anant bhalerao smriti award zws