Anant Bhalerao Award announced loksatta editor Girish Kuber ysh 95 | Loksatta

अनंत भालेराव पुरस्कार गिरीश कुबेर यांना जाहीर

यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे जाणते अभ्यासक-विश्लेषक गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे.

अनंत भालेराव पुरस्कार गिरीश कुबेर यांना जाहीर
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर

औरंगाबाद : यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे जाणते अभ्यासक-विश्लेषक गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून १३ नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, असे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी सागितले.

‘मराठवाडा’ वृत्तपत्राचे संपादकपद दीर्घकाळ भूषविणाऱ्या अनंत भालेराव यांचे १९९१ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला महाराष्ट्रभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अनंतरावांनी ज्या हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात कृतिशील योगदान दिले, त्या संग्रामाच्या अमृतमहोत्सवी पर्वातील यंदाचा हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीस दिला जावा, असे प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने निश्चित केल्यानंतर समोर आलेल्या काही नावांमधून कुबेर यांचे नाव एकमताने निश्चित झाले.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीस अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्रा. प्रताप बोराडे, डॉ. प्रभाकर पानट, संजीव कुळकर्णी, डॉ. मंगेश पानट, डॉ. सुनीता धारवाडकर, श्रीकांत उमरीकर व डॉ. सविता पानट उपस्थित होते. या उपक्रमातील पहिला पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्याच संपादकीय संस्कारांखाली पत्रकारिता क्षेत्रात नावारूपास आलेल्या कुबेर यांचा अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानकडून गौरव होत आहे. त्यानंतरच्या काळात ‘लोकसत्ता’चे संपादक डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर तसेच विजय तेंडुलकर, पी. साईनाथ यांच्यासारख्या दिग्गजांना प्रदान करण्यात आला होता.

कुबेर गेली साडेतीन दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्रांत अनेक वर्षे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर मागील एक तपापासून ते ‘लोकसत्ता’चे संपादकपद भूषवत आहेत. वृत्तपत्रीय लिखाणाशिवाय कुबेर यांनी वेगवेगळय़ा विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची ‘अधर्मयुद्ध’, ‘एका तेलियाने’, ‘टाटायन’, ‘युद्ध जीवांचे’, ‘तेल नावाचे वर्तमान’ ही ग्रंथसंपदा वाचकप्रिय ठरली आहे. ‘लोकसत्ता’तील त्यांच्या निवडक अग्रलेखांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“तुम्ही शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले हे आम्हाला माहिती आणि…”, संदीपान भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

संबंधित बातम्या

जालन्याच्या झुकत्या मापावर दानवेंचा प्रभाव
औरंगाबाद, नागपूर, साताऱ्यात डिजिटल बँक लवकरच; ‘या’ दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उदघाटन
समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार