छत्रपती संभाजीनगर – देश-विदेशात हजारो अनुग्रहित शिष्यवर्ग असलेले येथील हरिहर सदगुरु शक्तिपीठ रेणुकामाता मंदिराचे शक्तिपीठाधीश अप्पा महाराज यांचे शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात मागील महिनाभरापासून उपचार होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हजारोंच्या संख्येने असलेल्या शिष्यवर्गामध्ये शोककळा पसरली. शेकडो भाविकांनी बीड वळण (बायपास) रस्त्यावरील रेणुकामाता कमान परिसरात गर्दी केली होती.

अप्पा महाराजांचे पार्थिव रेणुका माता मंदिर परिसरातील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी ठेवण्यात आले असून, सकाळपासून अंत्य दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. यातील निकटवर्तीय शिष्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्पा महाराजांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराजांच्या पश्चात पत्नी, अंबरीश महाराज व अनिरुद्ध महाराज ही मुले, सुना, मुलगी मीनाक्षी, जावई, नातवंडे व देश-विदेशात विस्तारलेला मोठा शिष्यवर्ग, असा परिवार आहे.

अप्पा महाराज हे मूळचे सोनाई हंसतीर्थ स्वामी अण्णा महाराज यांचे पुत्र होत. अण्णा महाराजांच्या निधनानंतर अप्पा महाराज यांनी त्यांची गादी सांभाळली. दरवर्षी गुरुपोर्णिमेला हरिहर सदगुरु शक्तिपीठ रेणुकामाता मंदिराच्या परिसरात मोठा उत्सव आयोजित केला जातो. अनेक कलावंत शिष्यांकडून सांगीतिक सेवा दिली जाते. या उत्सवाला देश-विदेशातील शिष्य आवर्जून हजेरी लावून गुरुसेवेत दाखल होतात. नवरात्रामध्येही रेणुका माता मंदिरात छत्रपती संभाजीनगर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी नऊ-दहा दिवस हजेरी लावतात.