छत्रपती संभाजीनगर – बीडसह राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील ठेवीदारांच्या सुमारे दोन हजार कोटी कोटी रुपये रक्कमेचा अपहार प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या प्रमुख असलेल्या अर्चना कुटेला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी अटक केली. अटकेनंतर त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
ईडीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणाचा तपास मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवरून सुरू असून जुलै २०२४ मध्ये महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये सुरेश कुटे व त्यांच्या सहकाऱ्यांवर ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष दाखवत विविध गुंतवणूक योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या योजनांत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या. मात्र, नंतर ठेवीदारांना केवळ अंशतः रक्कम परत देण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.ईडीच्या तपासात सोसायटीतील सुमारे २४६७ कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात कुटे समूहाशी संबंधित कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचे उघड झाले आहे. या कंपन्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा हमी न घेता ही कर्जरक्कम देण्यात आली होती. ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी तसेच इतर व्यावसायिक गुंतवणुकींसाठी वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वीच ईडीने अर्चना कुटे यांचे पती सुरेश कुटे यांना अटक केली आहे. दरम्यान, या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरू असून पुढील काळात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील कोट्यवधी रुपयांचा अपहार चर्चेत असून, कुटे दाम्पत्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
