छत्रपती संभाजीनगर : एमआयएमच्या प्रदेशाध्याबरोबर बेशिस्तीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. जर काळे धंदे करणारे आडवे येत असतील तर पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन करतो. पण पहायचेच असेल तर ‘ एमआयएम’ ची ताकदही असे धंदे करणाऱ्यांनाही दाखवू असा इशारा ‘ एमआयएम’ चे प्रमूख खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी दिला.
महापालिका निवडणुकीच्या त्यांच्या पहिल्या सभेवर पक्षातील नाराजांचा प्रभाव अधिक होता. त्यामुळे राजी – नाराजी पेक्षाही एकजूट होऊन आपले मत मांडण्याचा अधिकार देणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडा असे आवाहन त्यांनी केले.
आमखास मैदानावरील सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, की ‘ वंदे मातरम’ वर संसदेमध्ये चर्चा घडत असतना कोणी तरी उठून बाबासाहेबांच्या संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन बोलेल, असे वाटले होते. पण कोणी बोलले नाही. सगळे मुस्लिम खासदारही गप्प बसले. पण मुस्लिम असल्याचा गर्व असल्याचे सांगत संसदेच्या चर्चेत या विषयावर वेगळे मत मांडले. जर तुम्हाला असे मत मांडायचे असेल तर योग्य प्रतिनिधी निवडा.
परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत राजी नाराजींकडे लक्ष देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालाल तर वक्फ काळा कायदा डोक्यावर बसेल. त्यामुळे दिल्लीत जशी मशीद पाडली गेली. तसे सगळीकडे व्हायला वेळ लागणार नाही. मशिदी, दर्गे राहणार नाहीत. त्यामुळे झालेल्या चुकांपेक्षाही एकजूट महत्वाची आहे. चुका माणसांकडून होतात. पण जर चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले तर योग्य ठिकाणी आवाज पोहचणार नाही, असेही ओवेसी म्हणाले.
२१ माजी नगरसेवकांना तिकिटे न दिल्यामुळे असंतोष उफाळला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत अंतर्गत नाराजीवर ओवेसी यांनी भाष्य केले. नाराजी असणारच आहे. माणसाकडूनच चुका होणार आहेत. पण नाराजीतून बंडखोरी निर्माण होणार नाही, असे प्रत्येकाने पहावे असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे दोन्ही गट, कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांना ही एकजूटच आवडत नाही. त्यामुळे एकजूट वाढवा असे ते म्हणाले. या वेळी हल्ला करणाऱ्या काळे धंदे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. नाराज असणाऱ्या नासेर सिद्यिकी यांनी ओवेसी यांच्या आदेशानुसार पुन्हा कामाला लागणार असल्याचे आवर्जून स्पष्ट केले.
