नांदेड ः भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन नांदेड-हडपसर एक्स्प्रेससह मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.
या भेटीदरम्यान खा. चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नांदेड- हडपसर एक्स्प्रेसच्या मुद्द्यावर विशेष भर होता. ही गाडी हडपसरला पहाटे पोहोचत असल्याने प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी, ती पुन्हा पुणे मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी त्यांनी केली. पुणे रेल्वे स्थानकावर गाडी उभी करण्यासाठी जागा नसल्यास ती पनवेल-चिपळूण किंवा मिरज, सांगली, कोल्हापूरपर्यंत वाढवण्यात यावी, असा पर्यायही त्यांनी सुचवला. तसेच, वेळेअभावी डब्यांची योग्य देखभाल होत नसल्याने या गाडीची हरंगुळ-हडपसर गाडीसोबत असलेली ‘रेक शेअरिंग’ बंद करून दोन्ही गाड्यांना स्वतंत्र रेक उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या दुरुस्ती व प्लॅटफॉर्म्सची कामे सुरु असून, त्यानंतर या मागणीबाबत विचार करणे शक्य असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी याबाबत उत्तर देताना सांगितले. यासोबतच, आगामी मुंबई-हैदराबाद वंदे भारत स्लीपर ट्रेन मनमाड-छत्रपती संभाजीनगर-नांदेड मार्गे चालवावी, जेणेकरून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या भागाला या प्रीमियम व आधुनिक रेल्वे सेवेचा लाभ मिळेल, असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी सुचवले.
नांदेड रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मालटेकडी यार्डात सुमारे ४८८.१० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असलेल्या कोचिंग डेपोची उभारणी करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर झालेला आहे. या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना केली. ऑगस्ट २०२५ मध्ये मंजूर झालेल्या १७७.२९ किमी लांबीच्या व सुमारे २ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या छत्रपती संभाजीनगर – परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता देखील त्यांनी विषद केली.
नांदेडच्या श्री हजूर साहेब रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्याबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक गोंधळाकडेही त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. पीआयबीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नांदेड रेल्वे स्थानकाचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेमध्ये समावेश असल्याचे नमूद आहे, मात्र दक्षिण मध्य रेल्वेच्या यादीत नांदेडचे नाव नसल्याचे खा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
