नांदेड ः लोकसभेमध्ये मराठवाड्यातून भाजपाचा एकही खासदार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आगामी काळात हे चित्र बदलण्यासाठी भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर राजकीय निर्णय घेण्याची गरज आहे. या विभागाकडे लक्ष देण्याचीही गरज आहे, असे मत या पक्षाचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या रविवारी होणार्या निवडणुकीच्या निमित्ताने खा.चव्हाण यांचे शुक्रवारी रात्री जिल्ह्यात आगमन झाले. हैदराबादहून नांदेडला येत असतानाच बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे बँकेच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका व्यापक बैठकीत त्यांनी राजधानी दिल्लीतील एकंदर परिस्थितीवर वक्तव्य केले होते.

पण त्यानंतरच्या घडामोडींमध्ये रविवारी दुपारनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे शनिवारी येथे घेतलेल्या वार्ताहर बैठकीमध्ये या संदर्भातील प्रश्नांना चव्हाण यांनी सावधगिरीने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. प्रधान यांनी आता राजीनामा दिलेला असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेली कोंडी सुटली असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. राजीनामा देण्यास उशीर झाला का, या व अन्य प्रश्नांवर भाष्य करण्याचे त्यांनी शिताफीने टाळले.

खा.चव्हाण यांनी याच वार्ताहर बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच वीजबिल माफी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतान व त्यांचे आभार मानताना त्यांच्यामागे लोकप्रिय, सन्माननीय, दिलेला शब्द पाळणारे अशी अनेक विशेषणे लावली. या दोन वेगवेगळ्या योजनांमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला.

वार्ताहर बैठकीच्या शेवटी भाजपाच्या मराठवाड्यातील परिस्थितीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपा नेतृत्वाला मराठवाड्यात लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. यासंदर्भात पक्षाच्या पातळीवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, डॉ.संतुकराव हंबर्डे, संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, डी.पी.सावंत, आ.राजेश पवार आदी उपस्थित होते.

युवाशक्ती व लोकशाहीचा विजय-खा.रवींद्र चव्हाण

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा म्हणजे देशाचे संविधान, लोकशाही आणि युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. युवाशक्तीच्या आक्रमकतेपुढे अहंकारी आणि मुजोर मोदी सरकारला नांगी टाकावी लागली. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याही लढ्याचे हे यश आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त करताना खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने देशातील शिक्षण व्यवस्थेची अक्षरशः वाट लावली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षण विषयक तरतुदींमध्येही मोठी कपात सुरू केली आहे.