नांदेड : भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रातील येळेगाव (ता. अर्धापूर) येथील कर्जबाजारी तरुण शेतकरी गुणाजी बापुराव पवार यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर या कठीण प्रसंगी खा. चव्हाण यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी खा.चव्हाण यांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती, कर्जाचा बोजा तसेच विविध तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. पवार कुटुंबाकडे असलेले ट्रॅक्टर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेत वापरासाठी घेण्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांना सूचना देत कुटुंबाला स्थिर उत्पन्नाचा आधार मिळवून देण्याचे पाऊल उचलले.

तसेच शासनाच्या विविध योजनांमधून कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत एकटे पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या प्रसंगी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, बी.आर.कदम, संतोष पाटील कपाटे, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

तरुण शेतकरी गुणाजी पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबातील कर्ता पुरुषच निधन पावल्याने कुटुंबाला मोठ्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खा. अशोक चव्हाण यांची भेट कुटुंबाला आधार देणारी आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळही भेट देणार!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आसूड मोर्चाच्या निमित्ताने २३ जून रोजी नांदेड शहरात दाखल होणार आहेत. यावेळी ते आत्महत्याग्रस्त पवार कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस खा. रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.