छत्रपती संभाजीनगर : वादग्रस्त खरेदीखतावर आपण स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणाऱ्या अशोक खारातच्या पत्नी कल्पना यांचा अटकपूर्व जामिनाची अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमूतीै आर. एम. जोशी यांनी फेटाळला. आरोपी कल्पना खरातने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल केलेल्या फसवणूक व बेकायदेशीर सावकारी प्रकरणात कल्पना खरात हिस अटक होईल या भीतीने अर्ज केला होता.

कल्पना खरात यांचा जमीन व्यवहाराशी प्रथमदर्शनी संबंध असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याने त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले. शिर्डी पोलीस ठाण्यात कल्पना खरात विरोधात सावकारी केल्याचे प्रकरण दाखल आहे. या गुन्ह्यात कल्पना खरात, त्यांचे पती अशोक खरात आणि अन्य तिघांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

आर्थिक गरज असल्याने फिर्यादीने एका मित्रामार्फत अशोक खरात यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला होता. आरोपींनी दरमहा २ टक्के व्याजदराने ३ कोटी रुपये कर्ज देण्याचे मान्य केले. मात्र . त्या बदल्यात शेतीजमिनीचे खरेदीखत करून देण्याची अट फिर्यादीस घातली होती. त्यानंतर संबंधित जमीन कल्पना खरात यांच्या नावावर करण्यात आली. कर्जाची व्याजासह परतफेड झाल्यानंतर जमीन परत केली जात नसल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. जमीन परत करण्याबाबत या प्रकरणी सामंजस्य करार झाला होता.

या प्रकरणी मुख्य आरोपी अशोक खरात यांची पत्नी असल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला. २३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या व्यवहारात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती, त्या उपस्थितही नव्हत्या, असे सांगण्यात आले. यास विरोध करत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. बी. गिरासे यांनी, तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले विशेष मुखत्यारपत्र आणि खरेदीखत यांसह कागदपत्रांवरून कल्पना खरात यांना व्यवहाराची पूर्ण माहिती होती आणि त्या त्यात सहभागी होत्या, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

या व्यवहाराशी संबंधित ८५ लाख रुपयांच्या व्यवहारांच्या बँक नोंदी सादर केल्यानंतर दिशाभूल केली जात असल्याचे निरीक्षण नोंदवत कल्पना खरात यांचा जामीन अर्ज फेटाळला.