स्कूल बसला नवीन परवाना, तसेच इतर परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर दिनकरराव जायभाये, तसेच उपेंद्र ऊर्फ बाबू जयप्रकाश रॉय हा एजंट लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला. गुरुवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
यातील तक्रारदाराच्या ओळखीची व्यक्ती स्कूल बसेसचा शाळेला पुरवठा करते. वैयक्तिक अडचणी असल्यामुळे त्यांनी तक्रारदारास अधिकारपत्र देऊन त्यांना पाच बसेसला स्कूल बसचा परवाना नसल्यामुळे स्कूल बसमध्ये त्या सामावून घ्याव्यात, तसेच शाळेच्या मालकीच्या आणि शाळेतील मुलांची ने-आण करण्यासाठी सात बसेसना परवाना, एका स्कूल बसच्या परवान्याचे नूतनीकरण, दुय्यम परवान्याची प्रत आणि आठ स्कूल बसच्या परवान्याचे नूतनीकरण करून घ्यायचे होते. या कामाचे कागदपत्र तयार करून गेल्या सोमवारी अधिकारी जायभाये याची भेट घेतली. जायभाये याने या साठी लागणारे ११ हजार ३५० रुपये शासकीय शुल्क भरण्यास सांगितले. तक्रारदाराने ते आर. टी. ओ. कार्यालयात भरले. मात्र, यानंतर जायभाये याने हे काम करण्यासाठी १० हजार रुपये लाच मागितली व आपल्या केबिनसमोर बसलेल्या वरील व्यक्तीकडे हे पैसे देण्यास सांगितले. तक्रारदाराने या बाबत मंगळवारी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्याप्रमाणे विभागाने पडताळणी करून पंचासमक्ष लाचेची ७ हजार रुपये रक्कम मागणी करून उपेंद्र ऊर्फ बाबूकडे देण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता लावलेल्या सापळ्यात जायभाये व हा एजंट अडकले. या कारवाईनंतर जायभाये याच्या घरात झडतीसत्र सुरू करण्यात आले.