हिंगोली: जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपूत्र अतिष दांडेगावकर गुरुवारी मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे चार हजार कार्यकर्त्यांसह होणारा हा प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पदाधिकारी अतिष दांडेगावकर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. वसमत विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.
अतिष दांडेगावकर हे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव असून सहकार, शेती आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी सक्रिय काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर जयप्रकाश दांडेगावकर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापले होते. आतिष दांडेगावकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय गणिते बदलतील, असा दावा केला जात आहे.

