हिंगोली : औंढा नागनाथ शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. भ्रमधध्वनी विक्री व दुरुस्ती, बॅटरी तसेच इलेक्ट्रिकल साहित्याची ही दुकाने होती. अग्निशमन दलांनी सुमारे दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. वीज तारांच्या घर्षणांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

औंढा नागनाथच्या जुन्या बसस्थानक परिसरात विविध प्रकारची दुकाने आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास यातील एका दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. जवळच असलेल्या हॉटेल चालकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना सावध केले. काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आग पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक थांबवून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. औंढा नागनाथ आणि हिंगोली येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सकाळी नऊच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत सहा दुकाने जळून खाक झाली होती. सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीष बेद्रे, अब्दुल कदिर आणि रामभाऊ साळुंके अशी दुकान मालकांची नावे आहेत. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. महसूल विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.