हिंगोली: औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात लागलेल्या आगीत संकलीत मूल्यमापन चाचणीचे तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या चाचणीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात बुधवारी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. केंद्रातून धूर निघत असल्याचे एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास येताच तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

तसेच पोलिसांनीही तातडीने भेट देऊन पंचनामा केला.या आगीत संकलीत मूल्यमापन चाचणीचे सुमारे १२ हजार प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व इंग्रजी विषयांच्या चाचण्या ११, १५ व २२ एप्रिल रोजी नियोजित आहेत. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते.

औंढा नागनाथ तालुक्यातील १३ केंद्रांपैकी सात केंद्रांना पेपर वितरित झाले होते, तर उर्वरित सहा केंद्रांसाठीचे पेपर केंद्रात ठेवण्यात आले होते.
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे ऐन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी तातडीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे नव्या प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदविली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असून, वेळेत पेपर उपलब्ध झाल्यास नियोजित तारखांनुसारच परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.