छत्रपती संभाजीनगर – हवेची एक झुळक आली की नाका-मस्तकात दुर्गंधी अशी शिरते की गजबजलेल्या बाजारपेठेसारख्या परिसरातून पाय काढता घ्यावासा वाटतो. वाहनधारक किंवा पायी जाणाऱ्या येणाऱ्यांची ही अवस्था. मिनिट-दोन मिनिटांचा क्षणभरही थांबावेसे वाटू शकत नाही तिथे वर्षानुवर्षे भाजी-फळ विक्रेते व दुकानदार दररोजच दुर्गंधीसोबत दिवस काढत असल्याचे चित्र आहे संकल्पनेतील स्मार्टसिटीतले. म्हणजे औरंगपुरा भागातील भाजी मंडईच्या परिसरातले. दुर्गंधीतून जातानाही जीव नकोसा वाटतो.

औरंगपुरा भागातील महात्मा फुले भाजी मंडईच्या शेजारचा परिसर दररोज दहा हजारांच्या संख्येने नागरिकांचा राबता असलेला भाग, बाजारपेठ. अत्यंत गजबजलेला. या परिसरात शंभरपेक्षा अधिक संख्येने चहुबाजूने दुकाने आहेत. मंडईच्या शेजारून गेलेल्या खाम नाल्यातून प्रचंड दुर्गंधी सुटलेली असते. परंतु या दुर्गंधीवर आता कोणीच काही बोलत नाही. आम्हाला कारण माहितीय. कोणीच काही करणार नाही. सत्ता बदलली, नेत्यांनी कपडे बदलावेत तसे पक्ष बदलले. पुन्हा सत्तेत आले. परंतु वर्षानुवर्षे सुटलेली दुर्गंधी काही रोखू शकलेले नाहीत, अशी फळ-भाजी विक्रेते, किराणा माल, केळी-बटाट्याचे चिप्सचे व्यावसायिक, पानटपरीचालकांची तीव्र प्रतिक्रिया.

पिढ्यान-पिढ्या फळ विक्रीचा व्यवसाय करणारे सत्तरीतील नासिर चाचा म्हणाले, काेणाकडे फिर्याद मागायची. कोणाला या दुर्गंधीविषयी बोलायचे. आता या दुर्गंधीसोबत जगणे अंगवळणी पडलेले आहे. कोणीच काही करू शकत नसल्याने आम्ही दुर्गंधीचा त्रास सहन करतच व्यवसाय करतो आहोत. आई-वडिलांसोबत भाजी विक्री करणारा तरुण विकास म्हणाला, दुर्गंधीमुळे अनेक जण व्यवसाय येथून सोडून गेले. परंतु मार्केट बसलेले असल्यामुळे आम्हाला सोडून जाता येत नाही. अब्दुलभाई म्हणतात ‘पापी पेट का सवाल है’ दुर्गंधीकडे लक्ष दिले तर उपाशी मरू. जगणंच दुर्गंधीसोबत ठरलेले असेल तर त्याच्यापुढे कुठे पळता येणार. परंतु दुर्गंधीवर काहीतरी करता येऊ शकते. पण इच्छा असेल तर. इथे कोणाला काही पडलेले नाही. कारण या दुर्गंधीचा त्यांचा त्यांना एखाद-दुसरा क्षण सामना करायचा असतो. आम्हाला मात्र, वर्षानुवर्षे दिवसभर दुर्गंधीसोबतच घालवावे लागतात.

रहेमानचाचा मागील पंधरा ते वीस वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या हातगाड्यासमोरच दहा फुटांवर मंडईशेजारचा नाला आहे. हवेची एक झुळूक आली की लगेच नाका-तोंडात दुर्गंधी जाते. मस्तकात दुर्गंधी शिरते. दुर्गंधी मिटवण्याचे काम महापालिकेचे आहे. पण काहीच होत नाही. साफसफाई झाली, काही भुकटी, रसायन त्यात नियमित टाकले तर दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल.

औरंगपुरा भागातील मंडई शेजारीच नवी एक इमारत बांधण्यात आली आहे. मागील दहा-बारा वर्षांपासून या मंडईचे कामकाज चालले. मध्यंतरी मंडईशी संबंधित वाद न्यायालयापर्यंत गेला होता. आताही सोळा गाळे आणि दोन मजली असणारी ही मंडई बांधून तयार झालेली आहे. परंतु त्याचे लोकार्पण झालेले नाही. गाळे वितरण आणि भाजी विक्रेत्यांना बसायला जागा मिळाली तर दुर्गंधीचा त्रास काही प्रमाणात कमी होईल, असे स्थानिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसीफ यांनी सांगितले की, मंडईचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा, या तत्त्वानुसार झालेले आहे. मंडईबाबतची अधिक माहिती कार्यकारी अभियंते संजय चामले यांच्याकडे आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडईची इमारत कंत्राटदाराकडून महापालिकेकडे हस्तांतरित करणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदार उच्च न्यायालयात गेला. परिणामी हस्तांतरण रखडले. बाकी कामे करण्यावर भर देण्यात येईल. – संजय चामले, कार्यकारी अभियंता, मनपा.