३८६ वर्षांनी औरंगाबाद शहराचे नामांतर!

शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी पुढे केला जाणारा औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांचा नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

aurangabad sambhajinagar

औरंगाबाद: शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी पुढे केला जाणारा औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांचा नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तब्बल ३८६ वर्षांनी  नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला. नामांतरामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील चौकाचौकात बुधवारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. खडकी, फतेहनगर,औरंगाबाद व संभाजीनगर असे नामांतराचे टप्पे शहराने अनुभवले आहेत. दरम्यान नामांतर करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली होती.  विभागीय आयुक्तांनी दोन शहराची नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील सत्ताकारणात महाविकास आघाडी बहुमतासाठी कसरत करत असताना शहराचे नाव बदलण्याचा हा निर्णय शिवसेनेची हिंदुत्वावरुन कोंडी करणाऱ्यांना उत्तर देता यावे यासाठी घेण्यात येत आहे. भाजप व हिंदुत्वावादी संघटनेत काम करणारे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे नेते औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करत. मंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमातही संभाजीनगर असा उल्लेख होत असे. मात्र, शासकीय दफ्तरी औरंगाबाद हेच नाव होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच आपण संभाजीनगर म्हणतोच मग नाव बदलण्याची गरज काय, असेही म्हटले होते. त्यामुळे शिवसेना नामांतरण प्रकरणी बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका केली जात होती. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याच्या या निर्णयास भाजपकडूनही विरोध होणार नाही. मात्र, ही कृती करण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली. दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध असेल असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्वी सांगितले होते. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेनेची होणारी कोंडी राजकीय पटलावर अधिक मोठी होऊ शकेल असे कॉग्रेस धुरिणांच्या लक्षात येत होते. बुधवारी अखेर नाव बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बदलण्यात आला.  ‘ ‘होय, संभाजीनगरच!’ असे फलक लावून गेली अनेक वर्षे शहराच्या नामांतराचा विषय चर्चेत ठेवण्यात आला होता. शहराचे नाव बदलण्यापूर्वी औरंगाबाद शहरातील विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्तावही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला होता.

औरंगाबादच्या नावाचा इतिहास

औरंगाबादचे यादवकालीन नाव खडकी होते. तत्पूर्वी ‘राजतडक’ असेही नाव होते, असे इतिहास अभ्यासक सांगतात. पुढे मलिक अंबरने त्याच्या मुलाच्या नावावरून औरंगाबादचे नाव फत्तेनगर केले. त्यानंतर मोघल काळात १६३६ मध्ये फतवा काढून औरंगाबाद हे नाव देण्यात आले, असे इतिहास तज्ज्ञ रा.श्री. मोरवंचीकर यांनी सांगतले.  औरंगाबाद शहरातील हिंदुत्ववादी संघटना शहराचा संभाजीनगर असाच उल्लेख करत. आता तो उल्लेख शासकीय कागदोपत्रीही होऊ शकणार आहे. ३८६ वर्षांनंतर औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यात आले.

उस्मानाबाद नावाचा इतिहास

१९०४ मध्ये शेवटचा निजाम मीर उस्मान अली याने धाराशीवचे नाव उस्मानाबाद असे केले. तत्पूर्वी हे शहर ‘धाराशीव’ नावाने ओळखले जाई. गोदावरी व कृष्णा या दोन खोऱ्यांची शीव म्हणजे सीमा म्हणून धाराशीव असे म्हटले जात. पुढे या नावाला अनेक मिथक जोडले गेले. शहरातील देवीचे नाव धारासूर असल्याने आसुराला मारणाऱ्या देवीच्या गावाचे नाव म्हणून धाराशीव ओळखले जाई.

‘नामांतराचा मुद्दा राजकीय ठेवण्यासाठीच तो  निर्णय घेतला गेला नाही. केवळ नाव बदलण्याचे राजकारण केले. हा निर्णय घेताना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेबरोबर होते. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रांना जोडे मारो अशा स्वरूपाचे आंदोलन एमआयएमकडून हाती घेतले जाणार आहे. शिवाय न्यायालयातही दाद मागू. नावे बदलून इतिहास बदलता येत नाही. आता राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास त्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून भाजप कसे वागते हेही पहावे लागेल. निर्णय झाला असला तरी शांततेत रहा, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

-इम्तियाज जलील, खासदार औरंगाबाद

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aurangabad city renamed hindutva decision cabinet meeting approved ysh

Next Story
माजी मंत्री प्रा. सुरेश नवले एकनाथ शिंदे गटात
फोटो गॅलरी