औरंगाबादेत केवडय़ाचे दीडशे वर्षांपूर्वीचे बन!

औरंगाबादजवळील माळीवाडय़ात ५०० झाडांचे केवडय़ाचे बन असून त्याचा दरवळ पुण्या-मुंबईत पसरतो आहे.

गौरी-गणपतीच्या सणोत्सवात पुण्या, मुंबईत दरवळ

औरंगाबाद : औरंगाबादजवळील माळीवाडय़ात ५०० झाडांचे केवडय़ाचे बन असून त्याचा दरवळ पुण्या-मुंबईत पसरतो आहे. गौरी-गणपतीच्या सणोत्सवांमध्ये होणाऱ्या व्यवसायातील नफा-तोटा न पाहता सुमारे दीडशे ते पावणे दोनशे वर्षांपासूनचे हे बन येथील गाणार कुटुंबीय जिवापाड जपत आहेत.

औरंगाबाद शहरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरातील माळीवाडा गावात बहुतांश गाणार कुटुंबीय राहतात. यातील दिलीप गाणार यांच्या कुटुंबीयांकडून केवडय़ाच्या बनाचे जतन केले जाते. त्याबाबत दिलीप गाणार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात उस्मानाबाद, पंढरपूरसह काही मोजक्या ठिकाणीच केवडय़ाची बने आहेत, त्यातील सर्वात मोठे आपल्याकडील बन आहे. साधारणपणे ५०० च्या आसपास झाडं आहेत. वर्षांतून गौरी-गणपतीच्या सणाच्या महिन्यातच व्यवसाय होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे-मुंबईला गौरी-गणपतीच्या सणाला केवडय़ाचे महत्त्व आणि मागणी लक्षात घेऊन बनातील कणीस, पाने पाठवण्यात आली आहेत. औरंगाबादच्याही बाजारपेठेत केवडय़ाची विक्री केली जाते. पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेसाठी २५० रुपयांना एक कणीस, अशा ठोक दरात मालाची विक्री केली आहे. बनातून एक हजार ते दीड हजार कणीस निघतात. सर्वसामान्य माणसाला पूर्ण कणीस घेणे परवडत नाही. त्यामुळे त्याची पाने विक्री केली जातात. एका कणसातून पंधरा ते वीस पानेही निघतात. बहुतांश माल पुणे-मुंबईला पाठवण्यात आल्यामुळे आजच्या दिवशी औरंगाबादेत  ५०० रुपयांना अस्सल कणीस, तर साधे पानांचे तयार केलेले कणीस ५० रुपयांना विक्री करावे लागत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aurangabad half hundred years old ganeshotsav ssh