शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी धोक्यात आल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नाव ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला. आता महाराष्ट्रात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर आता औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नामकरणाच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. नामांतराला विरोध करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. नामांतरणाचा मुद्दा हा हिंदू-मुस्लिमांचा मुद्दा आहे. आम्ही संभाजी महाराजांचा आदर करतो. पण सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्याने २५-३० वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये येऊन औरंगाबाद शहराचं नामकरण व्हायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

त्या नेत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नामांतराचा अन्याय सहन का करायचा? असा प्रश्नही जलील यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वपक्षीय बैठकीत बोलताना ते म्हणाले की, माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर देखील औरंगाबादच असायला हवं.

हेही वाचा- “…तेव्हा शरद पवार तोंडात लाडू घेऊन बसले होते का?”, इम्तियाज जलील यांचा खोचक सवाल

पुढे बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणाच्या वेळी आपण शांत बसलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील, शहराचं नामकरण होतं असताना तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामकरणाला विरोध झालाच पाहिजे. याप्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचंही जलील यांनी सांगितलं. याशिवाय गरज पडली तर नामातरणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad renamed as sambhajinagar mim imtiaz jaleel statement on all party meeting regarding name change of aurangabad rmm
First published on: 06-07-2022 at 14:12 IST