छत्रपती संभाजीनगर : कंपनीतच एका सुरक्षा रक्षकाकडे त्याचे तीन यार मित्र आले आणि तेथेच ते ‘बसले.’ रात्रीची वेळ होती. औद्योगिक वसाहतीचा परिसर रात्री शांत होता. एवढ्यात एक जण कंपनीत शिरल्याचे मद्यपान करत बसलेल्यांपैकी एका मित्राने पाहिले आणि त्याने सर्वांना सावध करून त्या शिरलेल्या व्यक्तीला केबल चोर समजून पकडले. त्याला बेदम मारहाण केली. यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला अन खाडकन नशा उतरली. मृत्यू लपवण्याचा प्रयत्न झाला पण फसला. खुनाचा गुन्हा नोंदक करून पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या.
वाळूज औद्योगिक परिसरातील हमालवाडा पाईप कंपनीत वायर चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला संशयास्पद मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत हा खून असल्याचे स्पष्ट केले. कंपनीचा सुरक्षारक्षक आणि त्याच्या तिघा मित्रांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहल जाधव यांनी दिले.
सुरक्षा रक्षक राहुल बाबुराव दुतोंडे (२४), ऋषिकेश बबन वक्ते (२५), रोहित संतोष नगराळे (१९) आणि चंद्रकांत भाऊसाहेब मारकळ (२१, सर्व रा. खंडोबा मंदिर, सातारा गाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
१८ फेब्रुवारीच्या रात्री हमालवाडा येथील एका पाईप कंपनीच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक ठिकाणी सूज व गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने बोथट वस्तूने प्रहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची दिशा खुनाकडे वळवण्यात आली.
घटनास्थळी त्या रात्री उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाची चौकशी केली असता सुरुवातीला विसंगत माहिती देण्यात आली. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत वायर चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याची कबुली आरोपींनी दिली.
घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक दुतोंडे हा ड्युटीवर होता. त्याचे मित्र कंपनीत आले होते. चौघांनी आवारातच मद्यपान केले. त्याचदरम्यान एक अनोळखी व्यक्ती वायर चोरण्याच्या उद्देशाने आत शिरल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला पकडले. नशेत असलेल्या आरोपींनी संबंधितास दोरीने खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली. गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यांनी कारवाई केली
ही कारवाई निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, हवालदार दिगंबर राठोड, सुनिल पवार, सुनिल बेलकर, संदीप चिंचोले, सचिन काळे, दिनेश भुरेवाल, सुरेश काळे, सुभाष पाचे, कल्याण निकम आदींनी केली.
आरोपींना तीन दिवसांची कोठडी
आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सुदेश दळवी यांनी आरोपींचा गुन्हा करण्याचा हेतु काय होता, गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथदार आहेत काय, गुन्ह्यात वापरलेले हप्तयार हस्तगत करायचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
