scorecardresearch

ऑरिकच्या बिडकीन प्रकल्पाला चालना; ‘कॉस्मोफिल्म’ व ‘पिरामल फार्मा’कडून १५२० कोटींची गुंतवणूक

दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

ऑरिकच्या बिडकीन प्रकल्पाला चालना; ‘कॉस्मोफिल्म’ व ‘पिरामल फार्मा’कडून १५२० कोटींची गुंतवणूक
संग्रहित फोटो

औरंगाबाद: दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांना ३११ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉस्मोफिल्म व पिरामल फॉर्मा प्रा. लि. असे या दोन कंपन्यांची नावे असून या दोन्ही कंपन्या सुरू झाल्यानंतर २ हजार ७०० जणांची प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. बिडकीन येथील औद्योगिक पट्ट्यात पहिल्यांदाच ३२०० रुपये चौरस मीटर दरात २५ टक्के सवलत देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय औद्योगिकपट्टा विकास मंडळाचे अमृतलाल मीना यांनी दिली.

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीमध्ये (ऑरिक) शेंद्रा येथील ३३३ भूखंड उद्योगांना देण्यात आले असून येथून उत्पादनही सुरू झाले आहे. मात्र, बिडकीन येथील क्षेत्रात अद्याप गुंतवणूक झाली नव्हती. दोन कंपन्यांनी आता गुंतवणूक केली आहे. कॉस्मोफिल्मसाठी १७३ एकर जमीन देण्यात आली असून ही कंपनी १०२० कोटी रुपयांची तर पिरामल फार्मा या कंपनीस १३८ एकर जागेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कॉस्मोफिल्मचा प्रकल्प २०२४ पर्यंत सुरू होईल तर पिरामलचे उत्पादन २०२३ मध्ये सुरू होईल.

बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी दळणवळणाच्या सोयी अधिक असल्याने येत्या काळात शेंद्रा- बिडकीन हे प्रकल्प विकासाला मोठी गती देणाऱ्या ठरतील असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. येत्या काळात पंतप्रधान गतीशक्ती प्रकल्पातून कामगिरीनिहाय प्रोत्साहन अनुदान योजनाही लागू होईल असे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद- पुणे हा रस्त्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याने तसेच ड्रायपोर्ट सुरू होणार असल्याने बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – औरंगाबाद औद्योगिक पट्ट्यात ७५० कोटींची गुंतवणूक

दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील शेंद्रा व बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आतापर्यंत पाच हजार १७१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून सात हजार ७३ प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिघी औद्योगिक वसाहतीमधील भूसंपादनही वेगात
दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील दिघी औद्योगिक वसाहतीसाठी २००० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरित १५ टक्के संपादनाची कारवाईही लवकरच होईल असेही अमृतलाल मीना यांनी स्पष्ट केले. रविवारी बिडकीन औद्योगिक वसाहतीमधील गुंतवणुकीच्या निमित्ताने ऑरिक सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, सहव्यवस्थापक जितेंद्र काकुस्ते आदींची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या