छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या १५४ प्रकरणांत २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या चौकशीसाठी काही लेखी प्रश्न आणि काही तोंडी प्रश्न विचारले जाणार आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याच्या विरोधातील या तपासावर विशेष देखरेख केली जात आहे. आतापर्यंत तरी पाठक यांनी तपासात सहकार्य केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मंजूर १५४ पैकी काही संचिका मिळत नसल्याने पाठक यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. दरम्यान त्यांच्या घराचीही झडती पोलिसांनी घेतली आहे.
भूसंपादन घोटाळ्यात महसूल विभागातील आणखी काही अधिकारी समाविष्ट आहेत का, याचा तपासही केला जात आहे. या प्रकरणातील पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ‘ संगनमत ’ कसे केले आणि त्यातील अर्थ व्यवहार नक्की कसे झाले, हे शोधणे पोलिसांसमोरचे आव्हान असणार आहे. वाटप झालेल्या ७३ कोटी रुपयांपैकी शेतकऱ्यांनी किती रक्कम पूर्वी अटक करण्यात आलेल्या १० कर्मचाऱ्यांना दिली व त्यापैकी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कशी पोहचली याचे पुरावे पोलिसांना शोधावे लागणार आहेत.
दरम्यान पाठक यांची चौकशी करण्यासाठी एक खास आराखडा तयार करण्यात आला आहे. काही प्रश्न लेखी आणि काही उपप्रश्न लेखी विचारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील अन्य आरोपींशी पाठक यांचा व्यवहार कसा हे सिद्ध करणारी कागदपत्रे व अर्थ व्यवहार पोलिसांना शोधावे लागणार आहेत. खऱ्या अर्थाने आजपासून चौकशी सुरू होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली.
भूसंपादन प्रकरणी काही उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी थेट माजी जिल्हाधिकाऱ्यांना अटक केल्याने बीड जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. गेली अनेक वर्ष एकाच तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आता ‘ अनागाेंदी ’ थारा नाही, असा संदेश या अटकेमुळे गेला आहे. चौकशी दरम्यान पाठक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले तसेच लातूर आणि पुण्यातील झडती घेतानाही पोलिसांनी आरोपीस बरोबर घेतले होते. ही कार्यपद्धती मानसिक पातळीवर आरोपीचे खच्चीकरण करणारी ठरते. अशा मानसिकतेमध्ये पाठक यांची मंगळवारी चौकशी होणार आहे. या प्रकरणात आणखी कोणी आहे का, याचाही आम्ही तपास करतो आहोत, असे सनदी पोलीस आयुक्त व्यंकटराम यांनी सांगितले.
