छत्रपती संभाजीनगर: शहराचाच एक भाग झालेल्या नारेगावात शनिवारी पहाटे एका चार वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीररीत्या जखमी केले. जखमी अवस्थेत तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु तेथेही तिची परवडच झाली असून, इकडे-तिकडे फिरवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

घाटीमध्ये सध्या रेबिज इंजेक्शन व लसीचा तुटवडा असून, शुक्रवारीच या संदर्भातील प्रश्न विधिमंडळात भाजपचे विधान परिषदेचे सदस्य संजय केणेकर यांनी उपस्थित केला होता. त्याच्या २४ तासाच्या आतच कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आयेशा मुनवर शेख या बालिकेच्या कुटुंबीयांना अनुभव आला. तिच्यावरील उपचारासाठी घाटीमध्ये प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून काही राजकीय मंडळींना हस्तक्षेप करावा लागला, त्यानंतर आयेशावर उपचार सुरू करण्यात आले.

आयेशा मुनवर शेख ही चार वर्षांची मुलगी शनिवारी सेहरच्या नमाजासाठी अजान झाल्यानंतर लगेच उठून बाहेर आली तेव्हा तिच्या नारेगावातील घरातून बाहेर आली. परिसरात काहीसी सामसूम होती. आयेशाला एकटीला पाहून चार मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या अंगावरील कपडे फाटले व गंभीर स्वरूपाच्या शंभरच्या आसपास जखमा झाल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यात आयेशा बेशुद्ध पडल्यासारखी झाली होती, सेहरच्या नमाजासाठी उठलेल्या एका व्यक्तीमुळे ही घटना समोर आल्याचे आयेशाची आजी नसीम बेगम यांनी सांगितले.

आयेशावर साधारण उपचार करून तिला कुटुंबीयांसोबत घरी पाठवून देण्यात आल्याचा आरोपही काही निकटवर्तीयांकडून होत आहे. परंतु राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्यानंतर आयेशाला पुन्हा घाटीत दाखल करून घेण्यात आले व तिला अँट रेबीज व अन्य प्रकारची औषधे देण्यात आली.
घाटीच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले की, आयेशा शेखवर सध्या उपचार सुरू आहेत. तिला आवश्यक ते इंजेक्शन व औषधे देऊन उपचार सुरू आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्याने आयेशा भेदरलेली दिसून आली.

आयेशा मुनवर शेख ही आपल्या आई, भावासोबत नारेगावात राहात असून, तिची आई वडिलांपासून विभक्त राहते. याच परिसरात आयेशा आजोळ आहे. आयेशावरील हल्ल्यांमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. शहरात सध्या ५० हजारांवर मोकाट कुत्र्यांची संख्या असल्याचे सांगितले जाते आहे.