छत्रपती संभाजीनगर : मृत गुंड बाबा फर्जनच्या घरात सापडलेली हत्यारे, सहा हजार जिवंत काडतुसे याचे शिवसेनेच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. ‘एकेकाळी या शहरात एवढी हत्यारे ठेवणे हे गरजेचे होते. बाबा फर्जन हा हिंदूत्ववादी नेता होता. त्याने एका दंगलीत घराजवळ गोळीबार केला होता. तेव्हा या शहराची ती गरज होती. अगदी कोविडपर्यंत माझेही त्याच्या घरी येणे जाणे होते’, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी बाबा फर्जन यांचे समर्थन केले.

केवळ अंबादास दानवेच नाही तर मंत्री संजय शिरसाठ यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘या प्रश्नी मंत्री शिरसाठ आणि माझे मत सारखे आहे. फर्जन याच्या घरात यापेक्षा अधिक रक्कम असू शकते’, असे मत या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील दंगलीचा पूर्व इतिहास पाहता फर्जन यांच्या घरातून सहा हजारांहून अधिक जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली. मात्र, प्रथम नोंद अहवालात पोलिसांनी ६३२ एवढीच काडतुसे असल्याचे नमूद केले आहे. प्रसिद्धी पत्रक आणि प्राथमिक नोंद अहवालातील या नोंदी कमालीच्या चुकलेल्या आहेत. दरम्यान सापडलेल्या रकमेवरुन अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या कारवाईवर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी छाप्यात पाच कोटींहून अधिक रोख रक्कम आणि १५१.३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली होती. फर्जन याचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असून, या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मीटमिटा भागात फर्जनच्या एक एकर परिसरातील बंगल्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये पाच कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम आढळली. याशिवाय, वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकांमध्ये वापरण्यात येणारी ६ हजार ३५० जिवंत काडतुसे, २१ हत्यारे सापडली. चार शस्त्रांचा परवाना फर्जनच्या नावे होता. घरात मद्यसाठा, सोन्याचे १५१.३३ ग्रॅम दागिने आढळले. ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरुन झाली, कोणी याची माहिती दिली. छापा टाकताना सीसीटीव्ही होते का, कोण साक्षीदार होते, असे प्रश्न मंत्री संजय शिरसाठ यांनी उपस्थित केले होते.