छत्रपती संभाजीनगर : बच्चू कडू यांचा पक्ष शिवसेनेत विलीन होण्यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीचे कारण ‘मैत्री’ असे सामंत यांनी सांगितले असले, तरी त्यातील मेख विधान परिषद निवडणुकीशी जोडलेली होती, अशी चर्चा रंगू लागली आहे.

मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलन उपोषणादरम्यान सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी बच्चू कडू हे जरांगे यांना भेटण्यास जात. तसेच शेतकरी कर्जमुक्तीच्या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे आवर्जून गेले होते. या गाठीभेटीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्या अलीकडेच झालेल्या अंतरवली सराटीच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

गेल्या वर्षभरात उदय सामंत यांचे छत्रपती संभाजीनगरला अनेक दौरे झाले. मात्र, न्यायालयाने मुंबईतून आंदोलन गुंडाळण्यास सांगितल्यानंतर विजयी गुलाल घेऊन परतलेल्या जरांगे यांना भेटण्यासाठी आवर्जून कोणी मंत्री आले नव्हते. अचानक उदय सामंत का आले, असे प्रश्न विचारले गेले, तेव्हा आमची मैत्री आहे. सरकार म्हणून आरक्षण उपसमितीकडून बाकी असणारी सर्व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

पण या भेटीमागे बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. बच्चू कडूंचा आक्रमकपणा, जरांगे यांचे मराठा जातीचे संघटन यामध्ये उदय सामंत समन्वयाची भूमिका साधत असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे. मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठे कलह आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बांधलेले मतदारसंघ असणाऱ्या आमदारांची संख्या अधिक असली, तरी भूमिका मांडू शकतील, असे नेतृत्व नाही. माध्यमांच्या पातळीवर ‘बाइट’ देण्याची भूमिका मंत्री संजय शिरसाठ पार पाडत असले, तरी राजकीय पातळीवर बांधणी करण्याची क्षमता असणारे नेतृत्व मराठवाड्यात नाही. खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, संतोष बांगर, संजना जाधव, बालाजी कल्याणकर, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, आनंद बोंढारकर, बाबूराव कोहळीकर, तानाजी सावंत, अर्जुन खोतकर, असे १० आमदार आणि एक खासदार अशी ताकद असतानाही शिवसेनेची एखाद्या प्रश्नावरची भूमिका स्पष्टपणे समोर येत नाही.

जी भूमिका भाजपची तीच शिवसेनेची असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे आक्रमक नेतृत्व आणि जरांगे यांचे संघटन असा मेळ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड या तीन जिल्ह्यांत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही.