बहिणाबाईंच्या कवितांचा गोडवा आता हिंदीमध्येही

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिणाबाई अध्यासन केंद्राकडून या अनुवादाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे

अरे संसार संसार,
जसा तवा चुल्’ाावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अहिराणीचा गोडवा आठ अक्षरांतून उभा करताना माणूसपण आणि निसर्ग उभा करणाऱ्या कवयित्री बहिणाबाईंच्या अशा ४५ कविता आता हिंदीत अनुवादित झाल्या आहेत. प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी हे अवघड काम नुकतेच पूर्ण केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिणाबाई अध्यासन केंद्राकडून या अनुवादाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.
बहिणाबाईंच्या कवितेची वैशिष्टय़े म्हणजे प्रत्येक ओळीत फक्त आठ अक्षरे आणि दुसऱ्या व चौथ्या ओळीत अचूक भाष्य करीत जुळलेले यमक ऐकणाऱ्याला सुखावून जाते. एके दिवशी रेडिओवर ‘अरे संसार संसार’ ऐकताना यापूर्वी मराठीतील ३०हून अधिक पुस्तके अनुवादित करणाऱ्या वेदालंकार यांना जाणवले, की बहिणाबाईंच्या कविता अनुवादित करणे तसे आव्हानाचे काम असेल. त्यानंतर त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा जणू ध्यासच घेतला. अहिरणीचा अभ्यास केला.
ते सांगतात, ही भाषा मुळातच गोड आहे. यात ळ, श् ऐवजी य वर्णाक्षर वापरले जाते आणि ण शब्दाऐवजी न हे वर्णाक्षर वापरले जाते. जोडून, करून, वाहून या शब्दांना जोडीसन, वाहिसन, करीसन असे उच्चार होतात. ही भाषा हिंदीत नेताना १६ मात्रांचा चौपाही छंद उपयोगी पडेल, असे वाटले आणि अनुवाद सुरू केला.
अरे संसार कैसा संसार
जैसा गरम तवा चुल्हेपर
पहले लगे हात में चटका
तब मिलती है रोटी भाकर
अनुवादाची ही प्रक्रिया प्राचार्य वेदालंकाराचा आता जणू श्वास झाली आहे. त्यांनी तुकारामांच्या अभंगाचाही पद्यानुवाद केला. कितीतरी कविता आजही अनेकांच्या ओठावर असतात. अशीच एक कविता-
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर
अशा लोकप्रिय कविता हिंदी वाचकांना कळाव्यात म्हणून अनुवाद हाती घेण्यात आला.
मन ऐसा जिद्दी खिचवय्या
खडी फसल में जैसा ढोर
कितना रोको, भगाओ लेकिन
फिर फिर दपके फसल की और
बहिणाबाईंना निसर्गकन्या असे म्हटले जाते. माणूसपणाच्या कक्षा आणि सहजपणे व्यक्त करणारे त्यांचे काव्य आता हिंदीमध्ये जाणार आहे. ती भाषा अनेकदा अचंबित करते. त्याची गेयता साद घालते. ती साद अनुवादातही यावी, यासाठी प्रयत्न केल्याचे वेदालंकार यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबाद जिल्हय़ात उमरगा येथे राहून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अनुवादित केलेले हे बारावे पुस्तक ठरेल. छावा, ययाती, तुकारामाची अभंग गाथा, महात्मा फुले यांचे अखंड साहित्य अनुवादित केले असले, तरीदेखील ही भाषा आव्हानात्मक होती, मात्र अनुवादित आव्हान नेहमीच पेलल्याचे समाधान असल्याचेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bahinabai poems hind

ताज्या बातम्या