छत्रपती संभाजीनगर – अमेरिकेतील ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी-२०२५’ हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे. १०९ देशांमधील दाखल शेकडो छायाचित्रांमधून आलेल्या पाटील यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे.
राजस्थानमधील भरतपूर अभयारण्यातील पाण्याखाली शिकार करणारा स्नेक बर्ड आणि त्याच्या चोचीतील मासा हिसकावण्यासाठी आकाशातून झेप घेणारा राखाडी बगळा (ग्रे हेराॅन) यांच्यातील संघर्ष पाटील यांनी छायाचित्रातून टिपला आहे.
या छायाचित्राबद्दल आणि पुरस्काराबाबत माहिती देताना बैजू पाटील यांनी सांगितले की, छायाचित्राचा हा एक सेकंदाचा क्षण टिपण्यासाठी १५ दिवस एकाच जागी बसून निसर्गाच्या हालचालींचा अभ्यास केला. छायाचित्राला जगातील सर्वोत्तम कलाकृतीचा बहुमान मिळाला आहे.
पाटील यांना यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ‘टाइम्स ऑफ फोटो’ आणि ‘वाईल्डवॉचर’सारख्या जागतिक नियतकालिकांनी पाटील यांच्या कार्याची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या यशाचे वर्णन ‘भारतीय वन्यजीव क्षेत्राचा गौरव’ असे केले, असे पाटील यांनी सांगितले.
