छत्रपती संभाजीनगर – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता गुलाबराव ठाकरे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती कुलसचिवांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याला दिलेल्या पत्रात नमूद असून, त्यामध्ये हेमलता ठाकरे या त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे कुलगुरू, कुलसचिवांसह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार, गुन्हा दाखल करू शकतात, किंवा आत्महत्येसारखे कोणतेही अनुचित व कायदेबाह्य पाऊल उचलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असेही स्पष्टपणे उल्लेखित करण्यात आले आहे.
विद्यापीठ आणि उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्यातील वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. गतवर्षात (२०२५) जुलैमध्ये चिठ्ठी लिहून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी कार्यालयीन जागेवरूनही बराच वाद रंगला होता. बाबासाहेबांचे छायाचित्र आणि कामकाजातील दस्तांचा गठ्ठा हातात घेऊन त्या स्वत:च एका जागेतून दुसऱ्या ठिकाणच्या कार्यालयात पायी जात असल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमावर पसरल्या होत्या. त्यावरून विद्यापीठानेही हेमलता ठाकरे यांच्या वर्तणुकीची चित्रफित पत्रकार बैठक घेऊन माध्यमांना दाखवली होती. यामध्ये ठाकरे या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कशा संतापून बोलत असल्याचे दाखवताना या प्रकरणाची चौकशीही सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
विद्यापीठाच्या कुलसचिवांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याला १० जून रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हेमलता ठाकरे यांच्याविरुद्ध शासकीय कामात कुलसचिव म्हणून खाोटी स्वाक्षरी करणे, आस्थापना विभागाच्या पश्चात परस्पर खासगी एजन्सीशी पत्रव्यवहार करून कार्यालयातील शिस्तीचा भंग करणे, तसेच कुलसचिवांना अर्वाच्च व अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करणे या गंभीर आरोपांखाली विभागीय चौकशी करण्यात आली होती. सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. परांजपे यांच्यामार्फत ही चौकशी झाली. यामध्ये हेमलता ठाकरे यांच्यावरील तिन्ही दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवले आहे. २९ मे २०२६ रोजी त्यांना कुलगुरूंनी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्याचा खुलासाही ठाकरे यांच्याकडून असमाधानकारक आला असून, १० जून रोजी त्यांना सेवेतून काढून टाकले आहे, असेही या पत्रात नमूद आहे. ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध अनेक खोट्या तक्रारी केल्या असून, संपूर्ण प्रक्रियेला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. कुलगुरू व कुलसचिवांविरुद्ध ॲट्राॅसिटीचा फौजदारी गुन्हा नोंदवण्यासाठी दोन खासगी तक्रारी जिल्हा न्यायालयात दाखल केल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
आरोपांचे पुराव्यासह खंडन
आपण ६ मार्चपासून मंजूर अर्जित रजेवर असून, सुटीवर असतान नियमात नसलेली कारवाई केली आहे. आपण कारणे दाखवा नोटिसीला पुराव्यासह उत्तरे दिली आहेत. विभागीय चौकशी करणारे अधिकारी हे ६५ वर्षे वयाचे असावेत, असा नियम आहेत. आपली चौकशी ७५ वयाच्या न्यायाधीशांकडून केली आहे. आपणही बडतर्फीच्या कारवाईला विद्यापीठ न्यायाधिकरणात आव्हान दिले आहे. – हेमलता ठाकरे, उपकुलसचिव, तत्कालीन.
अंतर्गत बाब
विद्यापीठाशी अंतर्गत बाबींशी संबंधित एक पत्र आले आहे. त्यात नेमके नमूद काय हे पाहावे लागेल.- नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक, बेगमपुरा ठाणे</strong>
