छत्रपती संभाजीनगर – अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. कांग्रेसचे उमेदवार मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अर्ज दाखल केला असून, त्यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.

याच प्रक्रियेचा भाग म्हणून बारामतीची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नात असून, त्यांनी स्वतः या संदर्भाने आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमधील गहिनीनाथ गडावर गुरुवारी सकाळी आले होते. यावेळी गडाचे महंत, भाजपचे आमदार सुरेश धस हे यावेळी उपस्थित होते.

गडावर दर्शन घेऊन झाल्यानंतर निघताना त्यांनी सांगितले की, बारामतीची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आपण आज जेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सकारात्मक वाटले. दुपारपर्यंत त्यांनी काय घेतला याची आपल्यापर्यंत माहिती आली नाही.
नाशिकमधील कंपनीत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या आयटी कंपनीत लैंगिक छळाचे आणि धर्मांतरासारखे प्रकार होत असतील तर ते गंभीर असून, त्याची दखल घेतली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

गहिनीनाथ गडावर सध्या विविध कार्यक्रम सुरू असून, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली होती. मुंडे यांच्यानंतर मनोज जरांगेही येऊन गेल्याची चर्चा रंगली होती. मुंडे व जरांगे एका व्यासपीठावर येतात का, अशी चर्चा रंगली होती. परंतु धनंजय मुंडे हे आधी आले व नंतर मनोज जरांगे येऊन गेल्याचे सांगण्यात आले. मुंडे हे पुढे भगवान गडाचा जो नजीकच्या गावात नारळी सप्ताह सुरू आहे त्याठिकाणाकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.