scorecardresearch

औरंगाबाद शहराचा पाणीपट्टीचा मूळ दर आता २ हजार २५ रुपये ; पाणीपट्टीतील कपातीचा निर्णय लागू

जलउपविधीमध्ये सुधारणा करून त्याला मंजुरी देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे

water tap
प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पाणीपट्टीचा मूळ दर आता २०२५ रुपये असणार आहे.  कपात करण्यात आलेल्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा किंवा पाणीपट्टी अजून कमी करण्याचा निर्णय आता सर्वसाधारण सभेला असणार आहे. पुरेसे पाणी देत नसताना आकारला जाणाऱ्या सर्वाधिक पाणीपट्टीमुळे औरंगाबादकर वैतागले होते. पाण्याच्या राजकारणावरून कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून पाणीपट्ठी कमी करण्यात आली.

औरंगाबाद शहरातील नागरिकांना आता सहाव्या दिवशी पाणी मिळते. आठवडय़ातून एकदाच पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे.

आठवडय़ातून एकदा पाणी पुरवठा आणि पाणीपट्टी मात्र संपूर्ण वर्षांची अशी स्थिती असल्यामुळे पाणीपट्टीमध्ये पालिकेने कपात करावी अशी मागणी होत होती. आठवडय़ातून किमान दोन दिवस पाणी द्या अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत होती. ही मागणी करण्यात महिलावर्गाचा मोठा सहभाग होता. नागरिकांचा रोष कमी करण्याच्या उद्देशाने तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टीत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.

सध्या ४०५० रुपये पाणीपट्टी आकारली जात आहे, त्यात पन्नास टक्के कपात करण्याची घोषणा देसाई यांनी १३ जून रोजी केली. त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी महापालिकेने सोमवारपासून (४ जुलै) सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक तो ठराव पालिका प्रशासनाने घेतला असून तो शासनाला पाठवण्यात आला आहे. शासनाने मंजूर केलेल्या जलउपविधीमध्ये सुधारणा करण्याची विनंती देखील पालिका प्रशासनाने शासनाला केली आहे.

पाणीपट्टीत करण्यात आलेली कपात लागू करण्याच्या संदर्भात पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, पाणीपट्टी कपातीचा निर्णय पालिका प्रशासनाने आता लागू केला आहे. यापुढे २०२५ रुपये पाणीपट्टी आकारली जाईल. औरंगाबाद शहरासाठीच्या १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन ती योजना कार्यान्वित होईपर्यंत २०२५ रुपये पाणीपट्टी आकारली जावी अशी पालिकेची भूमिका आहे. त्यामुळे २०२५ रुपये हा पाणीपट्टीचा मूळ दर असणार आहे. त्यात वाढ करण्याचा किंवा त्यात कपात करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असणार आहे.

मंजुरीच्या अधिन राहून अंमलबजावणी

जलउपविधीमध्ये सुधारणा करून त्याला मंजुरी देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीच्या अधिन राहून पालिकेने पाणीपट्टी कपात लागू केली आहे असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Basic rate of water tax in aurangabad city will now be rs 2025 zws

ताज्या बातम्या