धाराशिव : बीड – धाराशिव – लातूर या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांना विजय मिळाला. अनेक वर्षे कॉग्रेसमध्ये काढल्यानंतर आपले मार्गदर्शक शिवराज पाटील चाकूरकर यांची परवानगी घेऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. ते विजयी झाले आणि आता लातूर, औसा, उमरगा, निलंगा यासह मराठवाड्यातील लिंगायत मतपेढींवर त्यांना प्रभाव निर्माण करता येईल असे मानले जात आहे. बसवराज पाटील यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्यस आणखी एक आमदार मिळाला आणि औसा मतदारसंघात अभिमन्यू पवार यांचे वर्चस्वही कायम राहिले.
बसवराज पाटील यांची ओळख माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे मानसपुत्र अशी. पाटील पूर्वश्रमीचे काँग्रेस घराण्यातील कट्टर कार्यकर्ते. जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले. उमरगा मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर बसवराज पाटील यांना लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून विजय मिळवला. दोन वेळा काँग्रेस पक्षातून निवडून आलेले बसवराज पाटील यांचे बोलणे सौम्य. मात्र लिंगायत मतांवर असणारा त्यांचा प्रभाव मोठा.
पुढे भाजपमध्ये जातानाही बसवराज पाटील यांनी शिवराज पाटील चाकुरकरांशी विचारविनिमय केला होता. बसवराज पाटील यांच्या विजयामुळे भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे मानले जाते. एकीकडे अभिमन्यू पवार यांचा मतदार सुरक्षित केला तर दुसरीकडे लिंगायत, मराठा मतपेढी सुरक्षित ठेवली. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटील यांना ७१९ मतांनी विजय मिळाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची १५० मते फुटली. महेश देशमुख यांना केवळ १२५ मते मिळाली. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सहकार क्षेत्रात कसे काम करावे याचे भान बसवराज पाटील यांना असल्याने राजकीय पटावर बऱ्याच हालचाली घडतील असे मानले जात आहे.
बसवराज पाटील व ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हा बँकेत राणाजगजीतसिंह पाटील यांना विरोध केला होता. आता बसवराज पाटील आणि राणाजगजीतसिंह पाटील दोघही भाजपमध्ये आहेत आणि ओम राजेनिंबाळकर शिवसेनेच्या शिंदे गटात आल्यामुळे महायुतीमध्ये जुन्या संर्घषाला नवे धुमारे फुटतील, असे मानले जात आहे.
