घरासमोरील जागेचा वाद असल्याचे दर्शवून गावगुंडांनी महिला प्राध्यापकावर हल्ला केला व अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौकात रविवारी घडलेल्या या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यास गेलेल्या सुलभा बब्रुवान सोळंके व त्यांचे चुलते केशव जनार्दन सोळंके यांना पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे यांनी मारहाण केली व तक्रार नोंदवून घेण्याऐवजी आरोपींनाही विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडले, असे सांगत प्रा. सुलभा सोळंके यांनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडेच दाद मागितली.
मराठवाडय़ातील पोलीस दलाच्या कारभाराची पाहणी करण्यास आलेल्या दीक्षित यांना तक्रार देताना सोळंके यांनी त्यांना झालेली मारहाण किती भयंकर होती, याचे वर्णन केले. त्यांच्या दंडावरही लाठय़ा मारल्याच्या खुणा दिसत होत्या. या तक्रारीबाबत औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहानिशा केली. या अनुषंगाने तक्रार दाखल करून घेतली जाईल, असे या महिलेस सांगण्यात आले.
अंबाजोगाईच्या सावता माळी चौकात घरासमोरील जागेवरून एकनाथ घोडके यांच्यासमवेत वाद आहे. या जागेच्या अनुषंगाने न्यायालयीन खटल्यातही आपल्या बाजूनेच निकाल लागल्याचा दावा सुलभा सोळंके यांनी केला. रविवारी एकनाथ घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीवरून चालले असता त्यांना ओढून खाली पाडले. त्यांच्याजवळील आठ-साडेआठ हजार रुपयांचा भ्रमणध्वनी आणि २० हजार रुपये हिसकावून घेतले. घोडके यांच्यासमवेत १० पुरुष व महिला होत्या. त्यांनी चुलत्यासही मारहाण केली व जवळच असणाऱ्या पत्र्याच्या निवाऱ्यात अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.
या बाबत तक्रार घेऊन गेले असता उपअधीक्षक मोरे यांनी तक्रारदार महिलेस चापट लगावली व आरोपींनाही तक्रार देण्यास भाग पाडले, अशी लेखी तक्रार सोळंके यांनी दीक्षित यांच्याकडे दिली. घोडके यांनी केलेल्या मारहाणीच्या खुणाही त्यांनी दाखविल्या. या प्रकाराची योग्य ती दखल घेतली जाईल व कारवाई करू, असे नंतर पोलिसांनी सांगितले.