बीड: शर्यतीत धावताना मला माझ्या दोन्ही मुलींचे भविष्य समोर दिसत होते. पायाला खडे टोचत होते परंतु मी जिद्द हरली नाही. कारण मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुरस्काराची रक्कम जिंकायची होती. या जिंकलेल्या पैशातून मी माझ्या मुलीसाठी वही, पेन खरेदी करणार आहे. जेणेकरून तिला कोणतीही शैक्षणिक अडचण निर्माण होणार नाही.
बक्षीस जिंकण्याची जिद्द मी शेवटपर्यंत सोडली नाही म्हणूनच मी हे यश संपादित करू शकले, ही प्रतिक्रिया आहे रकमाबाई रणवीर यांची. वयाच्या ४७ व्या वर्षी अंगावर साडी आणि पायात स्लिपर घालून आई आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी धावली. या घटनेनंतर मुलीच्या शिक्षणासाठी मराठवाड्यातील पालक किती कष्ट घेतात हे पुढे आले.
‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण प्रचलित आहे. पण याची अनुभूती आली ती अंबाजोगाई शहरात शनिवारी आयोजित केलेल्या ‘अमृत दौड’ या धावण्याच्या स्पर्धेत. पतीच्या निधनानंतर हिंगोली जिल्हा सोडून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईत आलेल्या रमाबाई रणवीर ( वय ४७ ) या मुलीच्या शिक्षणासाठी स्पर्धेत धावल्या. जेणेकरून यात जिंकलेली रक्कम मुलीच्या शिक्षणाला उपयोगी पडेल.
विशेष म्हणजे या स्पर्धेत अनेक युवक युवती नामांकित कंपन्यांचे कपडे आणि बूट घालून स्पर्धेत सहभागी झाले होते तर दुसरीकडे रमाबाई अंगावर साडी आणि पायात कुजलेली चप्पल घालून धावल्या. अंगी असलेली इच्छा आणि समोर दिसणारे मुलीचे भविष्य या दोन गोष्टींमुळे या स्पर्धेत रमाबाईंनी तीन हजाराचे प्रथम पारितोषिक जिंकले. एका आईने मनाशी दृढनिश्चय केला तर असाध्य बाब देखील साध्य होऊ शकते याची प्रचिती अंबाजोगाई शहरात शनिवारी पाहायला मिळाली. या आईचे किंवा बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सध्या सर्वत्र विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने अंबाजोगाईच्या खोलेश्वर विद्यालयाच्या वतीने शनिवारी ‘अमृत दौड’ या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तरुण,तरुणींबरोबर अनेकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. मात्र प्रमुख आकर्षणाचा विषय ठरल्या त्या रमाबाई रणवीर. धावण्याच्या शर्यतीत सर्वात पाठीमागे उभा असलेल्या रमाबाई यांनी जेव्हा धावायला सुरुवात केली तेव्हा अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. पायातली चप्पल सारखी गळून पडत होती मात्र इच्छाशक्ती प्रचंड दांडगी असल्याने आत्मविश्वास मात्र गळून पडला नाही. याच आत्मविश्वासाच्या बळावर हातात चप्पल घेऊन रमाबाई धाव पूर्ण करू लागल्या आणि प्रथम क्रमांक आल्यावरच त्या थांबल्या.
मुलींच्या शिक्षणासाठी आईची धावपळ
पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यासाठी रमाबाई हिंगोलीवरून अंबाजोगाईत आल्या. येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांची एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत आहे. या केंद्रात काम करून रमाबाई दोन पैसे कमवतात आणि या पैशातून नांदेड येथे बीएससी कॉम्प्युटर करणाऱ्या मुलीचा शैक्षणिक खर्च भागवतात. धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे समजल्यानंतर रमाबाई यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला जेणेकरून बक्षीस रूपाने जिंकलेली रक्कम नांदेड येथे शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचा पाठवता येईल.
माझी आई खूप हिम्मतवाली
यावेळी बोलताना रमाबाई रणवीर यांची मुलगी पूजा रणवीर म्हणाली की, घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आम्हाला गावात घरकुल योजनेतून दोन खोल्यांचे घर बांधून दिले आहे. वडील आणि भाऊ नसल्याने सर्व जबाबदारी आता आईवरच आहे. परंतु माझी आई खूप हिम्मतवाली. ती स्वतःही हिम्मत हरत नाही व आम्हालाही हिंमत हरू देत नाही. आईला शिक्षणाची आवड आहे म्हणूनच ती स्वतः कष्ट घेत आम्हाला शिकवत आहे.
