बीड : मध्यवर्ती बसस्थानकात दारू पिऊन शुद्ध हरपलेली व्यक्ती, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि बंद पडलेले वाचनालय हे चित्र आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापसिंह सरनाईक यांच्या अचानक भेटीदरम्यानचे. हे चित्र पाहून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या निवासगृहाला भेट दिली येथेही त्यांना असुविधाच दिसून आल्या. नवे बसस्थानक बांधल्यानंतरची ही स्थिती पाहून मंत्रीही अवाक झाले.
बीड शहरातील हे मध्यवर्ती बसस्थानक सुरू झाल्यापासूनच सरकारकडे अनेक तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या होत्या. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्या बसस्थानकाला गळती लागली होती. काही दिवसांपूर्वी बसस्थानकात दोन तृतीयपंथी व्यक्तींनी धिंगाणा घातला होता. अशा विविध घटनांमुळे बीडचे बसस्थानक कायमच चर्चेत होते. याच अनुषंगाने धाराशिववरून परत जाताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकास अचानक भेट दिली आणि त्यांना अनेक त्रुटी दिसून आल्या. प्रसाधनगृहे, चालक-वाहक विश्रांतीगृह, उपाहारगृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांमधील त्रुटी आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
रॅपिडो कंपनी वर कारवाई करा
बीड शहरात रॅपिडो कंपनीने आपल्या ॲपद्वारे दुचाकीवरून वाहतूक सेवा सुरू केली आहे. मात्र, याची कोणतीही परवानगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही. तसेच गाडी आरक्षित केल्यानंतर ग्राहकांना मिळणारा गाडी क्रमांक आणि प्रत्यक्षात प्रवाशाला घेण्यासाठी आलेली गाडी यामध्ये अनेकदा तफावत आढळून येते.
या अनुषंगाने युवा सेनेचे मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल पिंगळे यांनी तक्रार केली . प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. मात्र, केवळ वाहनचालकांवर कारवाई करून चालणार नाही, तर संबंधित ॲप व कंपनी वर कारवाई झाली पाहिजे.या आशयाचे निवेदन पिंगळे यांनी सरनाईक यांना दिले.
