बीड: बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गोरेवस्ती येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वासनवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी श्रीराम शिवाजी वीर यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा, त्याचे नातेवाईक आणि मुलीच्या आई-वडिलांसह एकूण ६ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस यांना बीड शहरा लागत असलेल्या गोरेवस्ती येथे बालविवाह झाल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायत अधिकारी श्रीराम वीर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान, १७ वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता गोरेवस्ती येथील राहत्या घरासमोर साध्या पद्धतीने फुलांच्या माळा घालून तिचा विवाह घडवून आणण्यात आला होता. अल्पवयीन मुलगी असल्याचे माहित असूनही बालविवाहास प्रोत्साहन देऊन लग्न लावून दिल्याने ६ जणांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे बालविवाह वाढण्याची शक्यता जास्त आहे निवासी ठिकाणी काम नसल्यामुळे पालकांना ऊस तोड व इतर कामासाठी स्थलांतरित झाल्याशिवाय रोजगार मिळणार नाही स्थलांतरित होताना पालक किशोरवयीन बालिकांचे बालविवाह करण्याकडे त्यांचा जास्त कल असतो मुलींना सामाजिक संरक्षण व मोफत शिक्षण, निवास व पालकांच्या मनात सुरक्षितता निर्माण झाल्याशिवाय बालविवाहाचे प्रमाण कमी होणार नाही. – तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ता
तीन वर्षात रोखले गेले ६९२ बालविवाह
बालविवाह रोखण्यासाठी सध्या प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात ६९२ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले आहे. तसेच मागील तीन वर्षात बालविवाह लावल्याप्रकरणी 40 गुन्ह्यांची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे.
