बीडमध्ये काँग्रेस अस्तित्वहीन, तरीही रजनी पाटील यांना खासदारकी

सोनिया गांधी सक्रिय राजकारणात आल्या तसा रजनीताईंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

|| सुहास सरदेशमुख
राज्यसभेसाठी संधी दिल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्य

औरंगाबाद : मराठवाड्यातील बीडमध्ये काँग्रेसचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही, अशी परिस्थिती. तरीही या जिल्ह्यातील रजनी पाटील यांना पक्षाने दुसऱ्यांदा खासदारकीची संधी दिली.   एक जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य आणि केज नगरपंचायती वगळता तसे काँग्रेसचे वर्चस्व कोठे नाहीच. तशी काँग्रेसची कधी मोठी आंदोलने होत नाहीत. कोणी मागण्यांचे निवेदन देत नाही. उमेदवारीसाठी फारशी स्पर्धा नाही.

वाट्याला आलेल्या परळी मतदारसंघातून कोणी तरी निवडणुकीला उभे राहायचे आणि पराभव स्वीकारायचा, असा एकूण काँग्रेसचा कारभार असणाऱ्या बीडमधील रजनीताई पाटील यांना काँग्रेसकडून दुसऱ्यांदा राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. पक्षात अनेक इच्छुक असताना रजनी पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्याचे निकष कोणते, असा प्रश्न आता बीडमधील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

रजनीताईंचे राजकारण तसे बीडमध्ये कमी आणि दिल्लीत जास्त. म्हणजे कामाची रीत दरबारी राजकारणाची. गावात, गल्लीत काही घडले नाही तरी चालेल, पण पक्षनेता, त्याची धोरणे चांगली हे सांगता आले पाहिजे या निकषातून त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येते. रजनीताई पाटील काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी. तेथील एका कार्यक्रमात गुलाम नबी आझाद आणि फारुक अब्दुला यांचा जयघोष सुरू होता. या कार्यक्रमाला राहुल गांधीही हजर होते. तेव्हा दिलेले रजनीताईंचे भाषण त्यांच्या कामी आले, असा दावा केला जात आहे. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, प्रत्येक जण स्वत:चा जयजयकार करून घेत आहे; पण काँग्रेसचा जयजयकार कोणी करत नाही.

जर राहुल गांधींना जोपर्यंत पुढे नेणार नाही, काँग्रेस वाढविणार नाही तोपर्यंत व्यक्तिगत घोषणाबाजी कामाची नसते, अशी त्यांची भाषणातील भूमिका. त्याचा त्यांना लाभ झाल्याचे आता सांगण्यात येत आहे; पण जी भूमिका त्या जम्मूमध्ये मांडतात त्याच्या विपरीत चित्र बीड जिल्ह्यात दिसते. बीडमध्ये एवढे दिवस भाजपचा पगडा. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजप वाढत गेली. केशरकाकू क्षीरसागर यांना रजनीताई पाटील यांनी पराभूत केल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय उदय झाला. मुंडे यांनी त्यांना भाजपमध्ये घेतले होते.

पुढे सोनिया गांधी सक्रिय राजकारणात आल्या तसा रजनीताईंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांचे पती अशोक पाटील यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते; पण बीडमध्ये काँग्रेस काही वाढली नाही. तसे प्रयत्नही झाले नाहीत. त्यामुळे नेते मोठे पक्ष लहान असेच चित्र दिसून येते.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिका हे एक काँग्रेसचे सत्ताकेंद्र. राजकिशोर मोदी हे नेते; पण अलीकडे तेही नाराज आहेत. नव्याने पदाधिकारी निवडीत त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे काँग्रेसची ताकद तशी कमीच. केजमधील नगरपंचायत वगळता काँग्रेस आणि काँग्रेसचा नेता शोधावा लागतो अशी स्थिती. या मतदारसंघातील रजनीताई पाटील यांनी काँग्रेसवाढीसाठी तसे फारसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.

भाजपच्या विरोधातील मोर्चाचे नेतृत्व नाही की आंदोलनाच्या तयारीत आणि नियोजनातही त्या कधी नसतात. मग निवडीचे निकष कोणते, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणे स्वाभाविक आहे. दिल्ली दरबारी ओळख या भांडवलावर सारे काही घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष छोटा नेता मोठा हे चित्र पुन्हा एकदा काँग्रेसच्या निवडीमुळे निर्माण झाल्याचे बीडमधील राजकीय विश्लेषक सांगतात.

राष्ट्रीय राजकारणात रस

रजनीताईंचे राजकारण तसे बीडमध्ये कमी आणि दिल्लीत जास्त. म्हणजे कामाची रीत दरबारी राजकारणाची. गावात, गल्लीत काही घडले नाही तरी चालेल, पण पक्षनेता, त्याची धोरणे चांगली हे सांगता आले पाहिजे या निकषातून त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येते. रजनीताई पाटील काँग्रेसच्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी. तेथील एका कार्यक्रमात गुलाम नबी आझाद आणि फारुक अब्दुला यांचा जयघोष सुरू होता. या कार्यक्रमाला राहुल गांधीही हजर होते. तेव्हा दिलेले रजनीताईंचे भाषण त्यांच्या कामी आले, असा दावा केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beed congress is non existent but rajni patil is an mp akp