​बीड : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवला आहे, असा संदेश एका ई-मेलवरून आल्याने जिल्हा न्यायालय प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची झोप उडाली. ​​सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा धमकीचा ईमेल प्रशासनाच्या निदर्शनास आला. सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयाच्या मुख्य इमारतीसह इतर विभागांमधील माननीय न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या शेकडो पक्षकारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यास सुरुवात झाली. ​काय घडतंय हे समजण्याच्या आतच इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिल्याने न्यायालयात एकच धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

​बंदोबस्त

​घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांचे ठाणे प्रमुख तातडीने फौजफाट्यासह न्यायालयात दाखल झाले. त्यापाठोपाठ बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाने संपूर्ण परिसराला घेराव घातला. ​इमारतीचे प्रवेशद्वार बंद करून प्रत्येक कोपरा, गाड्यांचे पार्किंग, संशयित बॅगा आणि दस्तऐवजांची तपासणी केली जात आहे. पोलीस दल न्यायालय परिसरात ठिय्या मांडून असून संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे.

​थरार की केवळ अफवा? पोलिसांचे नागरिकांना आवाहन

​हा मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला? हा खरोखरच एखादा मोठा कट आहे, खोडसाळपणा, याबाबत पोलीस अथवा न्यायालय प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. ​सायबर सेलच्या मदतीने धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा डिजिटल सुगावा शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.