छत्रपती संभाजीनगर – दहा मिनिटे डोळे बंद करा, मग पाहा काय चमत्कार घडतो ते ! तुम्हाला सोन्याची अंगठी चमत्कारातून काढून दाखवतो, अशी भोंदूगिरी करत ज्येष्ठांना फसवणाऱ्या भामट्याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेत अटक केली आहे.
केज तालुक्यातील काशीदवाडी येथील भीमा सोनाजी जाधवर (वय ५८) यांनी फिर्याद दिली होती की, ते १ फेब्रुवारी रोजी उपचारासाठी पुण्यामध्ये होते. उपचार घेऊन गावाकडे परतण्यासाठी पुण्यातील बसस्थानकात आले. गावाकडे जाणाऱ्या पुणे-केज बसची स्थानकात बसून वाट पाहत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी जाधवर यांना तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे का, असे बोलुन त्यांची सोन्याची सहा ग्रॅमची अंगठी काढुन घेवुन पांढऱ्या रुमालात ठेवल्याचे भासवुन १० मिनीट डोळे बंद करा आणि डोळे उघडुन पाहिल्यावर बघा काय चमत्कार होतो असे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी अंगठी चोरी करून नंतर पोबारा केला, अशी तक्रार त्यांनी नोंदवली. त्यावरून गुन्हा नोंद होता.
या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड करत होती. या गुन्हयाच्या घटनास्थळास उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने भेट दिली. सी.सी.टी.व्ही ची पाहणी करुन दोन संशयित व्यक्तीचे फुटेज प्राप्त केले. या व्यक्तीची माहिती गोपनीयरीत्या प्राप्त केली. संबंधित व्यक्ती हे येवला येथील असुन मदारी खेळ करुन हातचालाखी करणारे आहेत, अशी माहिती मिळाली. यावरुन उपनिरीक्षक विघ्ने यांचे पथक येवला येथे रवाना झाले व फुटेजमध्ये दिसणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने या गुन्हा त्याचा साथीदार अशफाक राजु मदारी (रा. सावरगाव, येवला) याचे सह मिळुन केला असल्याचे कबूल केले. त्याचे ताब्यातुन चोरी केलेली सोन्याची अंगठी ६ ग्रॅम किं. २४ हजार रु व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या आरोपीस पुढील कारवाई कामी केज पोली संच्या यांचे ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याचा प्रयत्न केज पोलीस करीत आहेत, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, गणेश मराडे यांनी केली आहे.
