छत्रपती संभाजीनगर – ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची टोळी परराज्यातून सक्रीय असल्याची उदाहरणे आतापर्यंत समोर आलेली आहेत. परंतु परळीतील निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल २३ लाख ४२ हजार रुपयांना फसवणारे महाराष्ट्रातले असल्याचे समोर आले असून, बीडच्या सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पती-पत्नीसह तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी बीड येथील सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीतील तक्रारदार सूर्यकांत निवृत्तीराव मुंडे (रा. परळी) यांना डिजीटल अरेस्ट करुन २३ लाख ४२ हजार ८८८ रु. (तेवीस लाख बेचाळीस हजार आठशे अठ्याऐंशी रुपये) ची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.
तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बीड सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजीटल पुरावे गोळा करुन, जळगाव येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ तपास पथक रवाना करुन आरोपींचा शोध घेण्यात आला.
यामध्ये आरोपी प्रसन्न अजय कासट (वय ३१), स्वाती प्रसन्न कासट (२६), संकेत दीपक बेलदार (वय २२, तिघेही रा. जळगाव) हे करन्सी मार्केटमध्ये ट्रेडडिंग करून ऑनलाईन फसवणुकीचे पैसे स्वतःचे खात्यावर आर्थिक फायद्यासाठी घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने सायबर पोलीस स्टेशन बीड येथील पथकाने जळगाव येथून अटक केली आहे.
गुन्ह्यातील आरोपींना तपासासाठी सात दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली. दरम्यान, आरोपीने स्वतःचे पत्नीचे बैंक खात्यावर फसवणुकीचे पैसे घेतल्याचे दिसून आल्याने अटक करुन आरोपींकडुन नगदी तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच ३ लाख २० हजार रुपये बैंक खात्यावर गोठण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे. काय तसेच अजुन किती लोकांची फसवणुक करण्यात आली आहे याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश केळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप अराक, सहायक फौजदार भारत जायभाये, हवालदार विजय घोडके, अंमलदार नीलेश उगलमुगले, श्रीक्रष्ण टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण कक्ष येथील अश्विनकुमार सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांचे आवाहन
बीड जिल्हा पोलिसांचे नागरिकांना आवाहन आहे की, पोलीस असल्याची बतावणी करुन व्हिडीओ कॉल वर डिजीटल अरेस्ट करण्यात येत आहे असा कॉल आल्यावर यावर विश्वास ठेवू नये. डिजीटल अरेस्ट अशी कुठलीही संकल्पना कायद्यामध्ये नाही. तसेच असा कुठला कॉल आला अथवा सायबर फसवणूक झाली तर १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
