बीड – कधी काळी बीड जिल्हा स्त्रीभ्रूणहत्येच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता. 1000 मुलांमागे 841 मुली असा जन्मदर या बीड जिल्ह्यात होता . मात्र कालांतराने समाजात जागृती होत गेली आणि स्त्रीभ्रूणहत्या बीड जिल्ह्यात कमी होत गेल्या. आता बीड जिल्ह्यात मुलगी जन्माला आली तर तिचे वाजत गाजत स्वागत केले जाते. याचेच अजून एक आगळे वेगळे उदाहरण पाहायला मिळाले बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात. परळीतील दहिफळे कुटुंबात चार पिढ्यांनंतर (जवळपास 200 वर्षानंतर) मुलीचा जन्म झाल्याने दहिफळे कुटुंबीयांनी या नवजात मुलीची व तिच्या आईची ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढत उत्साहात स्वागत केले. चार पिढ्यानंतर पाचव्या पिढीत मुलीचा जन्म झाल्याने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुलगी असली तर घराला शोभा असते याची आम्हाला खंत वाटत होती. आता मुलगी झाली आम्ही आनंदी आहोत असे सांगताना आजोबा लिंबाजी दहिफळे भावुक झाले होते. तर दवाखान्यात आम्ही मिरवणूक काढायचं ठरवलं आणि वाजत गाजत नातीला घरी आणल्याचं मुलीची आज्जी सुरेखा दहिफळे यांनी सांगितले. चार पिढ्यानंतर मुलगी झाल्याने मुलीचे महत्त्व काय आहे हे आम्हाला समजले. आम्ही मुलीला फुलासारखं जपणार आहोत. साधारण दोनशे वर्षानंतर आमच्या घरात मुलीचा जन्म झालाय. मला सर्वजण म्हणतात मुलगा व्हायला पाहिजे पण मुलगी झाल्याचा आनंद वेगळा आहे. मुलीचे प्रेम वडिलांवर जास्त असते त्यामुळे मला मुलीची अपेक्षा असल्याचे तिचे वडील ऋषिकेश दहिफळे म्हणाले.
हजार मुलांमागे आठशे सत्तर मुली
बीड जिल्ह्यात स्त्री जन्मदर 1000 मुलांमागे 841 च्या निचांकी पातळीवर गेला होता. आज त्याच बीड जिल्ह्यात हा जन्मदर वाढत असून 870 पर्यंत आलेला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली जनजागृती,सरकारच्या विविध योजना आणि कायद्याचा धाक या तिन्ही बाबींमुळे स्त्री जन्मदर बीड जिल्ह्यात आता वाढताना पाहायला मिळत आहे.
