छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील २४१ कोटी ६२ रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची सही बनावट होती की नाही, याची तपासणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून केली जाणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीची दूरध्वनी संभाषणाचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलेल्या चौकशीतून ७३ कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला होता. या प्रकरणातील तपास बराच पुढे गेला असला तरी गुन्हा सिद्ध होण्यासाठी अनेक पुरावे गोळा करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान करण्यात आलेल्या सह्यांची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणीही केली जाणार आहे.

या गैरप्रकारात परळी येथील सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे संगणक परिचालक अविनाश चडखण , शेख अजहर शेख बाबू व बीड येथील सेवानिवृत्त कर्मचारी विनोद पिंगळे, सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील , ॲड. एस. एम. ननवरे, ॲड. नरवडकर, ॲड. पिसुरे, ॲड. प्रवीण राऊत आदीचा सहभाग असू शकतो,असे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते. बनावट आदेश तयार करण्याच्या गैरप्रकारात प्रमुख अधिकारी – कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर घोटाळा समोर आला होता. जुन्या तारखांचे ४० लवाद आदेश आढळून आले होते.

तत्कालीन जिल्हाधिकरी यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी करून दि. १ मार्च २०२५ ते १७ एप्रिल २०२५ पर्यंतच्या १५४ बनावट आदेश निर्गमित करण्यात आले होते. यातील सर्व कागदपत्रे आणि संचिका पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, हे तपासण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणात घडलेल्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर तो कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा केले जात असल्याचे सांगण्यात आले. बनावट सह्या, दूरध्वनीवरील संभाषणासह सर्व पुरावे गोळा करुन कारवाईची दिशा ठरवली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणातील आरोपींचे जबाब आणि दूरध्वनीवरील संभाषणाचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. सह्या बनावट होत्या की नाही, याची तपासणीही केली जाईल. सगळी कागदपत्रे तपासली जात असून गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई केली जाईल. – नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड