छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बीडच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. परंतु हा प्रश्न अजित दादांच्या निधनाला आठवडा व्हायच्या आतच मुख्यमंत्र्यांनी सोडवून नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच बीडच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे. आता सुनेत्रा पवार यांच्यापुढे बीडमधील राजकारण, मुंडे भावंडांचा जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभाव व त्यांची संघटनात्मक पातळीवरील पकड लक्षात घेता दोघांनाही हाताळण्याचे आव्हान राहील अशी चर्चा सुरू झाली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढील महिन्यात मुंडे मंत्रीपदावरून पायउतार झाले त्याला एक वर्षे होत असून, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न कायम चर्चेत असतात. डिसेंबर महिन्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यावरूनही मंत्रीमंडळात परतीचे वेध लागल्याची चर्चा रंगली होती.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासोबतच धनंजय मुंडेही दिसून आले होते. धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी व महायुतीच्या यापूर्वीच्या सरकारमध्ये बीडचे पालकमंत्री होते. त्यांना प्रशासकीय कामकाजाचा व जिल्हा नियोजन समितीच्या बैैठकीत येणाऱ्या प्रस्तावांचा आणि त्यातून करण्यात येणाऱ्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. पंकजा मुंडे यांनीही मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद यापूर्वीही हाताळले असून, त्याआडून जिल्ह्याच्या राजकारणावर कशी पकड मिळवायची, याचा अनुभव आहे.

एकेकाळी एकमेकांविरोधात लढलेले आणि परस्परांना टोकाचा विरोध केलेल्या मुंडे भावंडांमध्ये सध्या सामंजस्याचे आणि पूरक राजकारण सुरू असून, त्याची बीडमध्ये कायम चर्चा असते. दोघांचेही पक्ष वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये ‘सामंजस्या-करारा’चे राजकारण सुरू आहे. धनंजय मुंडे यांना त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले प्रकाश सोळंके हे कायम विरोध करण्याच्या भूमिकेत असतात. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. तर आष्टी-पाटोदा मतदारसंघातील राजकारणात मंत्री पंकजा मुंडे यांना धस यांनी उघडपणे विरोध करून टोकदार टीका केलेली आहे. या राजकीय परिस्थितीत मुंडे भावंडांकडून नव्या पालकमंत्र्यांवर बैठकांमध्ये प्रभाव निर्माण करून राजकारण केले जाण्याची शक्यता पाहता सुनेत्रा पवार या कसे दोघांनाही हाताळतात, याविषयीची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू झाली आहे.

बीडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी, माजलगाव व गेवराईतील मिळून तीन आमदार आहेत. तर भाजपकडे दोन विधानसभेतून निवडून गेलेले व पंकजा मुंडे या विधान परिषद नियुक्त, असे तीन आमदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांचे अलिकडे अजित पवार यांच्यासोबतच्या बैठका, चर्चांमध्ये वाढ झालेली होती. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार, असेही त्यातून चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत.

बीडमध्ये मराठा विरुद्ध आेबीसी असा संघर्ष आहे. खासदार बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी अ. प.) व सुरेश धस (भाजप), असे तगडे मराठा नेते आहेत. मुंडे भावंडे यांच्याकडे आेबीसी प्रवर्गाचे नेतृत्त्व म्हणून पाहिले जाते. केज या राखीव मतदारसंघातील भाजपच्या नमिता मुंदडा या आमदार आहेत. हा प्रवर्ग समतोलही सांभाळण्याचे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यापुढे आहे.