छत्रपती संभाजीनगर – राज्याच्या सत्तेत असलेला अजित पवार यांचा पक्ष व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिकरण होणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भाजप नेत्या, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तारांकित प्रचारक आमदार धनंजय मुंडे या भावंडांचे राजकारण काेणत्या वळणावर येऊन ठेपते, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. राष्ट्रवादीचे एकत्रिकरण महापालिका रणसंग्रामात शक्य झाले आहे. आता पुन्हा आगामी निवडणुकीत तेच चित्र दिसून आले तर बीडमध्ये मुंडे भावंडे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परस्परांविरोधात प्रचारात उतरल्याप्रमाणे पुनरावृत्तीचे चित्र दिसू शकते.

बीडमध्ये लोकसभा, विधानसभा आणि परळीतील नगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भाजपने महायुती धर्म पाळून लढवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विजयासाठी वडील बंधू आणि युती धर्म म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयत्नांची शिकस्त केली होती. तर परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांना मराठवाड्यातून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणण्यात मंत्री पंकजा मुंडे यांचेही योगदान मानले जाते.

परळी नगरपालिका निवडणुकीतही राज्याच्या सत्तेतील तिन्ही पक्षांनी महायुती कायम ठेवली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्रित येऊन राज्याच्या सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपविरोधात लढल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असला तरी हेच एकत्रिकरणाचे समीकरण आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कायम ठेवून लढण्याविषयीची चर्चा वरिष्ठ पातळीवर जोर धरत असतानाच त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मुंडे भावंडांचे राजकारण नेमके कोणत्या वळणावर येऊन थांबते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला तर बीडमध्ये पक्षाची जबाबदारी ही आमदार धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली जाणार हे निश्चित मानले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा निवडणूक प्रभारीपदी आधीच नियुक्त केले आहे. तर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

भाजपकडून बीडमध्ये त्यांची ताकद आजमावण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्या तर मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचे राजकारण पुन्हा एकदा नवे वळण घेऊन एकमेकांच्या विरोधात उभे राहील, असे सध्याचे तरी चित्र आहे.

२०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून ३५ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव झालेला होता. निवडणुकीत दोन्ही भावंडांनी परस्परांवर केलेले आरोप राज्यभर चर्चेत आले होते. २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन राजकारणाने नवे वळण घेतले. परस्परांचे विरोधक असलेले राष्ट्रवादी व भाजपच्या युतीचे नवे समीकरण जन्माला आले. युतीधर्मानुसार मुंडे भावंडांनाही त्यांच्यातील कटूता विसरून एकत्र येऊन राजकारण करण्यास भाग पाडले. आता पुन्हा राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्या तर मुंडे भावंडे परस्परांविरोधात प्रचार करताना दिसतील, असे संभाव्य चित्र निर्माण झाले आहे.

दाेन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा वरिष्ठ पातळीवरच सुरू आहे. अद्याप त्यावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. परंतु कार्यकर्त्यांना पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर घेतलेल्या निर्णय प्रमाण मानावा लागतो. कार्यकर्ते त्यांच्या समोर जो विरोधक असेल त्याच्याविरुद्ध लढण्याचे काम करतात. – राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)

कार्यकर्त्यांचा कल स्वबळाचा

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुलाखती घेतल्या असून, कार्यकर्त्यांचा कल स्वबळाकडे आहे. वरिष्ठ स्तरावर काय निर्णय होतो यानुसार निवडणुकांना सामोरे जाऊ. – शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप